कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील महापालिका, खासगी शाळांमध्ये सोमवारी शाळेच्या पहिल्या दिवशी पालिकेचे वरिष्ठ अधिकारी, खासगी शाळांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी शालेय अभ्यासक्रमातील वस्तू, गुलाबपुष्प देऊन, औक्षण करून स्वागत केले. यावेळी ढोल ताशांचा गजर करण्यात आला.
डोंबिवलीतील स्वामी विवेकानंद शाळेच्या दत्तनगर विभागातील मुलांना शालेय समिती सदस्या ॲड. ललिता जोशी यांच्या हस्ते पाठ्यपुस्तके देण्यात आली. यावेळी शाळेच्या प्रवेशव्दारावर मुख्याध्यापक, शिक्षकांकडून मुलांना औक्षण करण्यात आले. इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांंना मोफत पाठ्युपुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी वाटप करण्यात आली. मुख्याध्यापिका सुलभा बोंडे, पर्यवेक्षिका जयश्री दौंड आणि सहकारी शिक्षक वर्ग उपस्थित होता.
कल्याणमधील सम्राट अशोक विद्यालयात विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करत ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पुस्तके मोफत देण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष पी. टी. धनविजय, मुख्याध्यापक गुलाबराव पाटील आणि सहकारी शिक्षक उपस्थित होते. टिळकनगर शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या विविध शाळांमध्ये जाऊन अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, शहर अभियंता अनिता परदेशी, उपायुक्त संजय जाधव, शिक्षणाधिकारी विजय सरकटे आणि इतर पालक अधिकाऱ्यांनी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी स्वागत केले. त्यांना पाट्या, पुस्तके देण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. अनेक शाळांमध्ये फुगे, आकर्षक सजावट करण्यात आली होती.
शाळेत येणारा एकही विद्यार्थी शालेय वस्तूंपासून वंचित राहणार नाही याची विशेष खबरदारी यावेळी घेण्यात आली होती.