ऋषिकेश मुळे, नीलेश पानमंद
ठाणे : अवकाळी पावसामुळे जिल्ह्य़ातील शेतजमिनींना अक्षरश: झोडपून काढल्याने यंदा प्रथमच ठाणे जिल्ह्य़ात वैरणचा तुटवडा जाणवेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना भात पिकाच्या काढणीनंतर गुरांसाठी भरपूर वैरण मिळते असा आजवरचा अनुभव आहे. यंदा मात्र हे चित्र पूर्णपणे पालटले असून या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे पहिल्यांदाच वैरण विकास कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यासंबंधी माहिती दिली.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्य़ातील लागवडीखालील ४२ हजार ४०६ हेक्टर शेतजमिनीवरील पिकाचे नुकसान झाले. यामध्ये ४२ हजार २६२ हेक्टरवरील भाताचे, १२७ हेक्टरवरील नाचणी पिकाचे, तर ३७ हेक्टरवरील वरई पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान भाताची काढणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या गुरांसाठी वर्षभर पुरेल इतके वैरण मिळत असे. जिल्ह्य़ात ५० हजार हेक्टर क्षेत्र हे भातपिकाच्या लागवडीखाली आहे. यंदा अवकाळी पावसामुळे तब्बल ४२ हजार २६२ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाल्यामुळे वैरणची समस्या निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच वैरण विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांची वैरणची सोय व्हावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या विशेष कार्यक्रमाची बैठक नुकतीच ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आत्मा, कृषी विभाग यांच्याकडून ३ लाख, जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग यांच्याकडून २ लाख आणि जिल्हा नियोजन विभाग यांच्याकडून १ लाख असा ६ लाख रुपयांच्या रकमेचा हा वैरण विकास कार्यक्रम राबवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार जिल्ह्य़ातील १८६ हेक्टर क्षेत्रासाठी मक्याच्या आफ्रिकन टॉल वाणाच्या बियाणांचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे. यामध्ये १३ हजार ४३ किलो बियाणे जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानानुसार वाटप केले जाणार आहे. या वैरण विकास कार्यक्रमातून ५ हजार ५८० टन चाऱ्याचे उत्पादन होणार असल्याचे जिल्हा कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.
आफ्रिकन टॉल वाण असे
मक्याचे आफ्रिकन टॉल हे वाण केवळ गुराढोरांच्या वैरणसाठी वापरले जाते. मक्याचे आफ्रिकन टॉल हे वाण गुराढोरांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या वाढीसाठी उत्तम वाण समजले जाते. तसेच जमिनीत या वाणाची बियाणे लावल्यास ते ६० दिवसांत तयार होत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
अवकाळी पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाल्याने जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना गुराढोरांसाठी वैरणचीही समस्या निर्माण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना तारण्यासाठी वैरण विकास कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे.
– अंकुश माने, जिल्हा कृषी अधीक्षक, ठाणे
ठाणे जिल्ह्य़ात दरवर्षी मुबलक प्रमाणात वैरण उपलब्ध होत असते. राज्यातील दुष्काळी भागांना साधारणपणे रायगड जिल्ह्य़ात निर्माण होणारे अतिरिक्त वैरण पुरविले जाते. यंदा मात्र चित्र बदलल्याने वैरण विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
– राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी