ठाण्याच्या महापौरांचा सूचक इशारा

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. नागरिकांनी करोना नियमाचे पालन केले तर, हा प्रादुर्भाव रोखला जाऊ शकतो. परंतु या नियमांचे नागरिकांकडून पालन होत नसेल आणि रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर शहरात टाळेबंदी अटळ आहे, असा सूचक इशारा ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी दिला.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या दिवसांपासून करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असून शहरात दररोज तीनशेच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमी वर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी अधिकारी तसेच पालिका पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. त्यामध्ये शहरातील कोविड रुग्णालयातील व्यवस्थेचा आढावा घेण्याबरोबरच करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंबंधी चर्चा झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महापौर नरेश म्हस्के यांनी टाळेबंदीचा सूचक इशारा दिला.

ठाणे महापालिका क्षेत्रातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होत असून या ठिकाणी अंतर सोवळ्याच्या नियमाचे पालन होत नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी अनेकजण मुखपट्टीविना फिरत असल्याचे दिसून येते. त्यामुळे बाजारामध्ये गर्दी होऊ नये याची काळजी घेण्याच्या तसेच मुखपट्टीविना फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्याची माहिती म्हस्के यांनी दिली.

दक्षता समित्यांची बैठक

ठाणे शहरात करोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली असून त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचबरोबर यापूर्वी करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच जनजागृतीसाठी प्रभाग स्तरावर सामाजिक कार्यकत्र्यांची दक्षता समिती स्थापन करण्यात आली होती. या समित्यांची तातडीने बैठक घेऊन त्यांना पुन्हा कार्यन्वित करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांना दिल्या आहेत, अशी माहिती आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली. ठाणे शहरात दिवसाला दहा हजार जणांना लस दिली जात असून शहर लसीकरणात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी सांगितले.