ठाणे – शैक्षणिक वर्ष २०२५–२६ करिता राज्यस्तरीय केंद्रीयकृत अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील ४५४ कनिष्ठ महाविद्यालये या प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. सर्व विद्यार्थी आणि पालकांनी वेळापत्रकानुसार ऑनलाईन नोंदणी आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी केले आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण करताना, विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्रांची स्कॅन प्रत समाविष्ट करणे आणि संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष हजर राहून कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे.
गेल्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर झाला. ठाणे जिल्ह्याचा ९५.५७ टक्के दहावीचा निकाल लागला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजेच ९६.६९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर, जिल्ह्यात ९० टक्क्याहून अधिक गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या देखील जास्त आहे. त्यामुळे अकरावीत प्रवेश घेतना विद्यार्थ्यांमध्ये चांगली स्पर्धा रंगताना दिसणार आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून ठाणे जिल्ह्यातील ४५४ कनिष्ठ महाविद्यालये या प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांची इच्छा असते की, त्याच्या पसंतीचे महाविद्यालये मिळावे. परंतू, प्रत्येक महाविद्यालयात ज्या जागा उपलब्ध असतात त्या जागांवरच प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्यामुळे पसंतीचे महाविद्यालय आपल्याला मिळतंय की नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो. आता, विज्ञान, वाणिज्य, कला तसेच इतर क्षेत्रात किती विद्यार्थी प्रवेश घेतात याकडे लक्ष लागले आहे.
– प्रवेशासाठी तपशीलवार वेळापत्रक
दिनांक तपशील
१९ ते २० मे – सराव सत्र ( विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर)
२१ ते २८ मे – प्रत्यक्ष नोंदणी व महाविद्यालय पसंतीक्रम भरणे (१ ते १० पर्यंत)
३० मे – तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर
३० मे ते १ – जून हरकती व दुरुस्ती प्रक्रिया
३ जून – अंतिम गुणवत्ता यादी जाहीर
५ जून – गुणवत्तायादीवर आधारित प्रवेश वाटप (शून्य फेरी)
६ जून – वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध
६ ते १२ जून – Proceed for Admission पर्यायाद्वारे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे
१४ जून – दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर
– शिक्षणविभागामार्फत आवाहन…
विद्यार्थ्यांनी प्रथम पसंती मिळाल्यास तिथेच प्रवेश घेणे अनिवार्य राहील. एकदा प्रवेश घेतल्यानंतर तो अंतिम मानण्यात येईल. त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी यामध्ये गांभीर्याने सहभागी व्हावे आणि वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात येत आहे.