ठाणे : मोरपिसे विक्रीसाठी आलेल्या व्यक्तींकडून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वनपाल निलेश श्रावणे (४७) आणि वन रक्षक मच्छिंद्र सोनटक्के (२५) अशी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची नावे असून गुन्हा दाखल करु नये यासाठी त्यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

तक्रारदार हे सण -उत्सवाच्या कालावधीत मुंबईतील बाजारातून घाऊक दरात मोरपिसे खरेदी करुन ते मुंबई, ठाण्यात ग्राहकांना किरकोळ दरात विक्री करतात. गणेशोत्सव असल्याने त्यांनी मोरपिसे विक्रीसाठी आणली होती. त्यांनी भावाला आणि त्यांच्या ओळखीतील व्यक्तींना ही मोरपिसे विक्री करण्यासाठी दिली होती.

सोमवारी ते मोरपिसे विक्री करत असताना वन विभागाच्या पथकाने त्यांच्या भावाला आणि इतरांना ताब्यात घेतले. तसेच मोरपिसे जप्त करुन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करु नये यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. याबाबतची माहिती तक्रारदार यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे पथकाने पडताळणी केली असता निलेश श्रावणे याने गुन्हा दाखल करु नये आणि जप्त केलेली मोरपिसे परत देण्यासाठी तडजोडीअंती २५ हजार रुपये घेण्याची तयारी दर्शविल्याचे स्पष्ट झाले.

तसेच मच्छिंद्र सोनटक्के याने देखील श्रावणे याला लाचेची रक्कम घेण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणात पथकाने त्यांना २५ हजार घेताना रंगेहात पकडले. त्यांच्याविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.