ठाणे – येथील मो. ह विद्यालयात डिजीट ग्रंथालय सुरू करण्यासाठी विद्यालयाने वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निधीची मागणी केली. यावर नाईक म्हणाले, ठाण्यामध्ये भूखंड राहिला असल्याची मला शंका आहे. तरी आता पांचाळ नावाचे चांगले जिल्हाधिकारी आले आहेत. तुमचे अर्ज तुम्ही तिकडे द्या. मी एक दिवस तहसीलदाराला बोलवून या चोरांच्या नजरेतून भूखंड शिल्लक राहिला असेल तर तो मिळवून देतो, असे आश्वासन त्यांनी दिले.
ज.ए.इ.चे मो. ह विद्यालय आणि रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे यांच्या वतीने सुवर्ण महोत्सव शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर राज्यस्तरीय बोलीभाषा काव्य संमेलनाचेही आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन वनमंत्री, पालघरचे पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झाले.
यावेळी नाईक म्हणाले, मी कधीही कुठल्याही क्षेत्रात कामगार म्हणून गेलो नाही. लहानपणापासूनच समाज जीवनात कार्यरत राहिलो. दुसऱ्यांचे जीवन सुखद करण्याकरिता आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. तसेच कधीही अतिविशालद जीवन जगणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर कायम आनंद राहत नाही. त्यासाठी अंतर्गतातून गोष्टी केल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.
नाईक घराण्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले, नाईक घराणे फार पैसेवाले नाहीत. बंगले-गाड्या म्हणजे घरंदाजपण नव्हे. ज्या घरांमध्ये चांगले संस्कार आहेत, अशा समाजाच्या जीवनात वावरणाऱ्या लोकांचे जीवन म्हणजे संस्कारीक जीवन असे मी समजतो. तसेच २००४ मध्ये मला तीन लाख २४ हजार मते मिळाली. हे सर्व लोकांच्या प्रेमामुळे घडले. गणेश नाईक घडला तो ताकदीने नाही, तर लोकांच्या प्रेमाने असे देखील ते म्हणाले. त्याचप्रमाणे जनता दरबार घेऊन मी उपकार केले नाहीत आणि करणारही नाही. मी हे जीवन माझ्या समाधानासाठी जगतो, असे त्यांनी सांगितले.
जीवनतत्त्वज्ञान विषद करताना नाईक म्हणाले, जीवनाचा अर्थ बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि ज्येष्ठत्व या चार टप्प्यांमध्ये आहे. जगा आणि जगू द्या, हीच खरी शिकवण आहे. धर्म, जात, भाषा देवाने नाही बनवली. भाषा हे दोन मनातली भावना व्यक्त किंवा समजण्याची असते, परंतु देशांमध्ये धर्म, भाषा आणि जाती विषयी थेैमान सुरू आहे हे चांगला आहे का? असा सवाल करत. मी माणुसकी धर्म मानतो असे ते म्हणाले. विद्यालयाविषयी बोलताना ते म्हणाले, मो. ह विद्यालयाची परंपरा मोठी आहे. या विद्यालयाच्या डिजीटल ग्रंथालयासाठी माझ्या माध्यामातून ५० लाख रूपयांचा निधी दिला जाईल.