अंबरनाथ: अंबरनाथ शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. पालिका निवडणुकांच्या पूर्वी झालेला हा पक्षप्रवेश शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी धक्का मानला जातो. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रवेशाची चर्चा होती.

अंबरनाथ शहरात एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. अंबरनाथ शहराचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते. तशी संघटनात्मक बांधणी येथे होती. कालांतराने अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ आरक्षित झाला. त्यानंतर येथे शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित झाले. या काळात बाहेरच्या उमेदवारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रिकामा होत राहिला. शहरावरची पकड हळूहळू निसटली. त्यानंतर अवघे काही लोकप्रतिनिधी पालिका निवडणुकीत निवडून येऊ लागले. यात सदाशिव पाटील यांच्या माध्यमातून शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व टिकून राहिले.

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून वेगळे झाल्यानंतर अनेक पदाधिकारी त्यांच्यासोबत त्यांच्या गटात गेले. अंबरनाथ शहरातील शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक सदाशिव पाटील, त्यांचे पुत्र सचिन पाटील आणि महत्त्वाचे पदाधिकारी हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतच राहिले. मात्र विकास कामांसाठी, पक्ष वाढीसाठी आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सदाशिव पाटील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार याची चर्चा रंगली होती. त्याप्रमाणे मंगळवारी सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सदाशिव पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी सदाशिव पाटील यांची अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अंबरनाथ शहराध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.

पक्षात प्रवेश झालेल्या अनुभवी व्यक्तींचा नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाला नक्कीच फायदा होईल. यातून पक्ष बळकट होईल अशी भावना व्यक्त करत सुनील तटकरे यांनी सर्व उपस्थित व्यक्तींना शुभेच्छा दिल्या. तर विकासासाठी यापूर्वीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क येतच होता. विकास कामांना गती मिळावी म्हणून आपण आपल्या घरी परतावे अशी कार्यकर्त्यांची भावना होती. त्यातूनच आपण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्याचे सदाशिव पाटील यांनी सांगितले.

सदाशिव पाटील यांच्या अजित पवार गटात प्रवेशाने शहरातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थिती अगदी तोळा मासा झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला निवडणुकीपूर्वी हा मोठा धक्का मानला जातो. त्यातून पुन्हा संघटनात्मक बांधणी करून निवडणुकीला उतरण्यासाठी मोठी तयारी करावी लागणार आहे. नंबर अक्षरात शिवसेनेचे वर्चस्व आहे. अशा स्थितीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही यश मिळवण्यासाठी मोठे तयारी करावी लागणार आहे.