कल्याण :एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना जवळ घेतले. यावेळी हुरळून गेलेल्या पाटेकर यांनी एकनाथ शिंदे यांना उद्देशून ‘हे एक डाग नसलेले आणि निष्कंलकित नेता असल्याची टिपणी केली’. या टिपणीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही वेळ शहारले असले तरी, त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांनी मात्र, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना उद्देशून ‘एकदा अधिकारी आणि ठेकेदारांना विचारा नाना’ अशी टिपणी करत ‘नानाची टांग,’ अशी मल्लीनाथी केली आहे.
माजी आमदार राजू पाटील यांनी केलेली उपरोधिक टीका आणि मल्लनाथी समाजमाध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली आहे. मागील अनेक वर्षापासून काटई गावचे पाटील आणि ठाण्याचे शिंदे यांच्यात राजकीय आणि अन्य काही कारणांवरून वितुष्ट आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या काळात हे वितुष्ट नेहमीच उफाळून येते. २७ गावांमधील काटई गावचे राजू पाटील यांचा वडिलोपार्जितपासून २७ गावांमध्ये प्रभाव आहे.
कल्याण ग्रामीण हा कल्याण लोकसभा मतदारसंघातील एक मतदारसंघ आहे. खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचाही कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात प्रभाव आहे. विकासाची, नागरिकांची अनेक कामे त्यांनी तळमळीने मार्गी लावली आहेत. कोट्यवधीचा विकास निधी २७ गावांसाठी उपलब्ध करून दिला. .या भागातील अनेक प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने खासदार डाॅ. शिंदे यांनी मार्गी लावले आहेत. २७ गावांंमध्ये होत असलेली कामे ही आपल्याच पुढाकारातून होत आहेत. यामध्ये स्थानिक आमदाराचा काहीही सहभाग नाही, असे नेहमीच राजकीय चढाओढीतून खा. डाॅ. श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी नागरिक, कार्यकर्त्यांना दाखविण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग राजू पाटील यांना आहे.
आपण केलेल्या कामाचे श्रेय आपण घ्याच, पण दुसऱ्याच्या कामाचे श्रेय आपण का घेता, असे प्रश्न वेळोवेळी राजू पाटील यांनी शिंदे पिता पुत्रांना विचारले आहेत. शेतकऱ्यांना भरपाई मिळत नसल्याने शिळफाट्याचे रुंदीकरण रखडले आहे. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, राजू पाटील यांच्या पलावा भागातील घरासमोरील पलावा उड्डाण पूल अनेक वर्षापासून रखडला आहे. या सगळ्या कामांना शिंदे पिता पुत्रांचा अडसर असल्याची राजू पाटील यांची भूमिका आहे.
विधानसभा निवडणुकीत तर राजू पाटील यांना शिंदे पिता पुत्रांचे समर्थन मिळून आपण सहज विजयी होऊ असे वाटत असतानाच, शिंदे गटाने राजेश मोरे यांना उमेदवारी देऊन त्यांना पाटील यांच्या समोर टिच्चून निवडून आणले. हा न होणारा विजय पाटील यांच्या जिव्हारी लागला आहे. शिंदे पिता पुत्र जेथे कैचीत दिसतील तेथे पाटील त्यांना चिमटे, टोमणे मारण्याची संधी सोडत नसल्याचे समजते. या उद्वेगातून राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे किती निष्कंलकित आहेत ते ठेकेदार, अधिकाऱ्यांना विचारा, असे अभिनेते नाना पाटेकर यांना उद्देशून समाजमाध्यमांत एक चौकट प्रसारित केली आहे.