ठाणे : शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्याविषयी शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या विधानानंतर ठाणे जिल्ह्यातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या वादात आता दिघे यांच्या सोबत काम केलेले शिवसेनेचे माजी महापौर रमेश वैती यांनीही उडी घेतली असून त्यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते राजन विचारे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “आनंद दिघे हयात असताना राजन विचारे जादूटोणा करायचे, आनंदश्रमाबाहेर लिंबू टाकायचे.”, असे विधान त्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याविषयी एक विधान केले होते. “ शिंदे यांचे नेते मोदी आहेत. तुम्ही बाळासाहेबाच्या बाजुला जिल्हाप्रमुखाचे फोटो लावता. ही कोणती नवी पद्धत आणली. आनंद दिघे हे शिवसेनेचे नेते नव्हते, उपनेते नव्हते, ते ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते. आनंद दिघे यांचा संपूर्ण आदर ठेवून मी हे बोलत आहे की तुम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे ब्रँडचे महत्व कमी करायचे आहे म्हणून हे तुम्ही करत आहात का”, असे राऊत यांनी म्हटले होते. तसेच राजन विचारेंनी त्याग केल्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्य प्रवाहात आले. त्यामुळे शिंदे यांनी विचारेंचे पाय धुवून तीर्थ पियावे, असेही विधान त्यांनी केले होते. त्यांच्या विधानांतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
खासदार नरेश म्हस्के आणि पदाधिकारी हेमंत पवार यांनी संजय राऊतांच्या विधानाला प्रतिउत्तर दिले होते. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या कार्याची उंची कोणीही मोजू शकत नाही. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकसेवा आणि जनसेवेसाठी समर्पित केले आहे. दिघे यांनी जे समाजकारण केले त्याला तोड नाही. आनंद दिघेंची जे लोक थट्टा करतील, त्यांना आनंद दिघेच चमत्कार दाखवतील,” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना उद्देशून म्हटले.
त्यापाठोपाठ आता या वादात दिघे यांच्या सोबत काम केलेले शिवसेनेचे माजी महापौर रमेश वैती यांनीही उडी घेतली असून त्यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते राजन विचारे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वैती यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन हे आरोप केले. या वेळी शिवसेना सचिव राम रेपाळे, शहर प्रमुख हेमंत पवार, ज्येष्ठ शिवसैनिक विलास जोशी, माजी नगरसेवक अशोक वैती आणि प्रवक्ते राहुल लोंढे हे उपस्थित होते.
आनंदश्रमाबाहेर लिंबू टाकायचे
राजन विचारे यांनी आनंद दिघे यांच्यासाठी काय केले आहे. केवळ लिंबू फिरविण्याची कामे करत होते. जुन्या शिवसैनिकांना ही गोष्ट माहित आहे, त्यांना विचारा. ते याबाबत सांगतील. आनंदाश्रमाबाहेर दररोज लिंबू दिसायची. ही लिंब कुठून यायची, याचा शोध घेतला होता. त्यावेळी राजन विचारे हेच लिंब टाकत होते, हे आम्ही पकडले होते, असा गंभीर आरोप रमेश वैती यांनी केला. तसेच विचारे यांनी कोणताही त्याग केलेला नसून एकनाथ शिंदे यांच्या मेहरबानीमुळे आमदार आणि खासदार झाले होते. त्यामुळे विचारे आणि राऊत या दोघांनीही शिंदे यांचे पाय धुवून पाणी पिले तर, त्यांना अक्कल येईल, अशी टिकाही त्यांनी केली.
आनंद दिघे कोण होते
ठाणे जिल्ह्यामध्ये ९० च्या दशकात ठाणे शहरांपासून ते थेट वाडा मोखाड्याच्या पाड्यापर्यंत शिवेसना पोहोचवण्याचे काम करणारे दिवंगत शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे २३ वर्षांपूर्वी निधन झाले. पण, ते हयातीत असतानाही त्यांचा मोठा चाहता वर्ग होता आणि तो निधनानंतरही कायम असल्याचे चित्र सातत्याने दिसून येते. त्यांच्या नावाचा करिष्मा आजही कायम असल्याचे निवडणुकीत दिसून येतो.
शिवसेनेत दोन गट पडले पण, दोन्ही गटातील नेते आणि शिवसैनिक मात्र दिघेंना गुरुस्थानी मानतात. शिवसेना म्हणजे ठाणे आणि ठाणे म्हणजे आनंद दिघे असे जणू समिकरणच तयार झाले होते. यातूनच ‘शिवसेनेचा बालेकिल्ला…आनंद दिघेंचा ठाणे जिल्हा’ अशी घोषणा उदयास आली होती. शिवसैनिकांमध्ये त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती होती.