ठाणे : ठाण्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर यांना गुरुवारी वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) यांच्या भिवंडी विभागाने अटक केली आहे. दोन कोटी २६ लाख रुपयांचा सेवा कर (सर्व्हिस टॅक्स) भरला नाही म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना ९ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला म्हणून गुन्हा दाखल, जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांवर गंभीर आरोप

हेही वाचा – ठाण्यात मातीचा ढिगारा कोसळून दोघांचा मृत्यू, इमारतीच्या पायाभरणीच्या कामादरम्यान घडली घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेतील बंडाळीनंतर भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले असून, भोईर यांचा बाळकुम भागात मोठा प्रभाव आहे. गेले अनेक वर्षे त्यांच्यासह त्यांची पत्नी, वडील आणि भाऊ या भागातून निवडून येत आहेत. संजय भोईर यांनी २००८ मध्ये सेवा करासाठी नोंदणी केली होती. परंतु, त्यांनी केवळ २०१२-१३ आणि २०१३-१४ या कालावधीतील सेवा कराचा भरणा केला होता. तर २००८ ते २०१२ आणि २०१४ ते २०१८ या कालावधीतील सेवा कर भरला नव्हता. ही रक्कम दोन कोटी २६ लाख रुपये इतकी होती. त्यांच्या कंपनीने ज्यांना सेवा पुरवली त्या सर्वांनी त्यांच्याकडे सेवा कराचा भरणा केला होता. परंतु त्यांनी ही रक्कम शासनाकडे जमा केली नव्हती. याप्रकरणी गुरुवारी वस्तू आणि सेवा कर विभागाने भोईर यांना अटक केली.