नियोजन करण्यासाठी वेळ मिळाल्याने दिलासा

पूर्वा साडविलकर

ठाणे : करोना ओमायक्रॉन विषाणूचा धोका असल्यामुळे मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला. त्यामुळे १५ दिवसांचा कालावधी मिळाल्याने पुरेशा तयारीनेच शाळा सुरू करण्याच्या कामाला शाळा व्यवस्थापनांनी सुरुवात झाली आहे.    

राज्य सरकारने सुरुवातीला बुधवार, १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र यासंबंधी संभ्रमच अधिक असल्याने शाळा व्यवस्थापनाची पुरेशी तयारी झाली नव्हती. शाळा व्यवस्थापनांची मंगळवारी तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी अनेक शाळांनी काही ठरावीक वर्ग सुरू करण्याचा पर्याय निवडला होता. इतर वर्गाचे नियोजन करून टप्प्याटप्प्याने खुले करण्याचा काही शाळांनी घेतला होता तर अनेक शाळांमध्ये दिवसाआड मुले, मुली असे प्रवेश ठरवण्यात आले होते. ऐन वेळी झालेल्या या निर्णयामुळे अनेक शाळा व्यवस्थापकामधून नाराजी व्यक्त होत होती. ठाणे जिल्हा प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी उशिरा १५ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे शाळा व्यवस्थापकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पुरेसा कालावधी मिळाल्याने पूर्ण तयारीनिशी शाळा सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाने व्यवस्थापनांना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शिक्षण विभागातील सूत्रांनी लोकसत्ताला दिली.

चौकट

ठाण्यातील नौपाडा भागातील सरस्वती विद्यालयात पालकांच्या संमतीनुसार टप्प्याटप्प्याने वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ डिसेंबरपासून पहिल्या टप्प्यात तिसरी आणि चौथीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. तसेच पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा सुरू असल्यामुळे हे वर्ग दुसऱ्या टप्प्यात सुरू केले जातील. तर, तिसऱ्या टप्प्यात पहिली ते दुसरीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती शाळेचे संस्थापक सुरेंद्र दिघे यांनी दिली. तर, डोंबिवली येथील टिळकनगर शाळेत पाचवी ते सातवीचे वर्ग हे दोन सत्रात भरविले जाणार आहेत. यामध्ये सकाळच्या सत्रात मुली तर, दुपारच्या सत्रात मुले अशी विभागणी करण्यात आली असून प्रत्येक सत्र दोन ते अडीच तास सुरू राहणार आहे. तसेच पहिली ते चौथीच्या वर्गाचेही प्रत्येकी तीन तुकडय़ा असून शासन नियमानुसारच हे वर्ग देखील सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका लीना ओक मॅथ्यू यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तयारीचे टप्पे सुरूच

  • करोनाच्या नव्या विषाणूचा प्रादुर्भाव असाच आटोक्यात राहिल्यास शहरी भागात पहिली ते सातवी तर, ग्रामीण भागात पहिली ते चौथीचे वर्ग येत्या १५ डिसेंबरपासून सुरू होऊ शकतील.
  • शासन नियमानुसार प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटाचे अंतर असणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची आसन व्यवस्थेचे नियोजन कसे करावे असा प्रश्न ठाणे जिल्ह्यातील अनेक शाळा व्यवस्थापकांसमोर निर्माण झाला आहे. वर्गाचे र्निजतुकीकरण करणे, आसन व्यवस्था पाहणे तसेच विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी करण्याचे नियोजन बुधवारीदेखील वेगवेगळय़ा शाळांमध्ये सुरूच होते.
  • शाळा सुरू करण्यापूर्वी पालकांची संमती पत्र घेणे देखील गरजेचे असल्यामुळे बहुतांश शाळांमध्ये पुढील आठवडाभर पालकांच्या ऑनलाइन बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या संमती पत्राच्या आधारे व्यवस्थापकांना कोणत्या वर्गाचे किती विद्यार्थी शाळेत उपस्थित असणार आहेत याची माहिती मिळणार असून त्यानुसार, त्या विद्यार्थ्यांचे गट करून वर्ग भरविले जाणार आहेत, अशी माहिती काही शाळा व्यवस्थापकांनी दिली.