डोंबिवली : मैत्रिणीकडे उसने पाच हजार रूपये मागितले. पण ते मैत्रिणीने दिले नाही. म्हणून संतप्त झालेल्या डोंबिवली जवळील ९० फुटी रस्त्यावरील कचोरे गाव हद्दीतील एका मैत्रिणीचा मोबाईल तिच्या मित्रांनी पहाटे घरात गुपचूप येऊन चोरून नेला आहे. या चोरीप्रकरणी मैत्रिणीने आपल्या मित्रा विरुध्द टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
पंंधरा हजार रूपये किमतीचा हा मोबाईल आहे. या मोबाईल चोरीप्रकरणी ९० फुटी रस्त्यावरील श्रीकृष्णनगर भागात राहत असलेल्या साक्षी राघीनी राठोड हिने टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस उपनिरीक्षक आल. वाय. चौगुले याप्रकरणाचा तपास करत आहेत.
तक्रारदार राहत असलेल्या घरात गुरूवारी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान हा चोरीचा प्रकार घडला आहे. तक्रारदार साक्षी राठोड हिने पोलीस ठाण्यात तक्रारीत म्हटले आहे, की आपली मैत्रिण काश्मीरा हिच्याकडे चाॅद हा तरूण पाच हजार रूपये उसने देण्याची मागणी करत होता. आपण एवढी मोठी रक्कम देऊ शकत नाही. असे काश्मीरा चाॅदला सांगत होती. सतत मागणी करूनही तक्रारदाराची मैत्रिण आपणास पाच हजार रूपये उसने पैसे देत नाही याचा राग चाॅदला आला होता.
काश्मीरा उसने पैसे देत नाही म्हणून तिला धडा शिकवण्याचा विचार चाॅद करू लागला. त्यासाठी त्याने् काश्मीराची मैत्रिण साक्षी हिचा मोबाईल चोरण्याचा निर्णय घेतला. हा विषय त्याने आपल्या १९ वर्षाच्या मित्राला सांगितला. मित्र कल्याण पश्चिमेतील वाडेघर भागात राहतो. साक्षी किंवा तिची मैत्रिण सहज मोबाईल देणार नाही म्हणून साक्षीच्या घरात जाऊन तिचा मोबाईल चोरण्याचा निर्णय चाॅदने घेतला.
गुरुवारी रात्री ही चोरी करण्याचा निर्णय दोघांनी घेतल्यावर त्यांनी पाळत ठेऊन कचोरे येथे पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान जाण्याचा निर्णय घेतला. तक्रारदार साक्षीच्या घरात पहाटेच्या वेळेत गुपचूप आले. त्यांनी खोलीत चार्जिंगला लावून ठेवलेला मोबाईल काढून घेऊन गुपचूप घरातून बाहेर पडले. सकाळी कुटुंबीय उठल्यानंतर त्यांना साक्षीचा मोबाईल घरात आढळून आला नाही. घरात इतर कसलीही चोरी झाली नसताना केवळ मोबाईल चोरीला गेला आहे. त्यामुळे ही चोरी चाॅदने केली असल्याची खात्री पटल्यावर साक्षी राठोड हिने टिळकनगर पोलीस ठाण्यात चाॅद आणि त्याच्या मित्रा विरूध्द तक्रार केली आहे.