ठाणे – गणेशोत्सवासाठी काही आठवडे आधीपासूनच सर्वत्र जय्यत तयारी सुरू झाली होती. गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई आणि रंगीबेरंगी आरास करण्यासाठी लगबग सुरू होती. यामुळे बाजारास नवा रंग आला असून बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. अशातच गणरायाच्या गणरायाच्या आवडीच्या मोदकांची बाजारपेठ देखील यंदा विविध चवींनी गजबजलेली आहे.

पारंपरिक उकडीच्या मोदकांपासून ते नवनवीन रंग, आकाराचे आकर्षक आणि चवीष्ट मोदक बाजारात उपलब्ध झाले आहेत. तर, यंदा पारंपारिक उकडीच्या मोदकाच्या किंमतीत काही प्रमाणात वाढ झाली आहे.

गणेशोत्सव अवघ्या एक दिवसावर आला असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. गणेश मूर्तीच्या प्रतिष्ठापनेकरिता लागणारे आरासाचे साहित्य बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. खरीखुरी वाटणाऱ्या फुलांची आरास करण्यासाठी विविध कापडी तसेच प्लास्टिकची फुले आणि त्यासाठी लोखंडी सांगाडा देखील बाजारात उपलब्ध आहेत.

गणेश पुजनासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत. तसेच गोड पदार्थ घेण्यासाठी देखील मिठाईच्या दुकानात गर्दी होत आहे. दरम्यान, पारंपारिक उकडीच्या मोदकापासून चॉकलेट अक्रोड मोदक, क्रॅनबेरी मोदक, मँगो मोदक, काजु वेलची मोदक, शुगरलेस मोदक, डिझायनर मोक, विविध चवींचे मोदक पाहायला मिळत आहेत. एक हजारापासून ते एक हजार ६०० रुपये किंमतीला हे मोदक विक्री केले जात आहेत. कंदी मोदक, मावा मोदक, मोतीचूर मोदक यांची विक्रीदेखील मोठ्या प्रमाणात होत आहे.

यंदाही आरोग्यदृष्ट्या साखरमुक्त मोदकांसोबत शुगरलेस मोदकही पाहायला मिळत आहेत. तसेच, सुका मेव्यांपासून तयार करण्यात आलेल्या पौष्टिक मोदकही नागरिकांच्या पसंतीस येत आहेत. यामध्ये केसर-पिस्ता मोदक, काजू-वेलची मोदक, मिक्स ड्राय फ्रुट मोदक असे अनेक प्रकार आहेत.

पारंपारिक मोदकांना पसंतीगणेशाचे आवडते उकडीचे मोदक नैवेद्य म्हणून ठेवले जातात. या मोदकांना मागणी असल्याचे दिसून आले. उकडीचे मोदक हे घरघरात घराघरात बनवले जात असले तरी बाजारातही त्यांचे स्थान कायम आहे. यंदा एक उकडीचा मोदक ४५ रुपयांना विकला जात आहे. तर, मागील वर्षी ४० रूपयांनी मोदक विक्री केला जात होता. यंदा यात ५ रूपयांची वाढ झाली आहे.

विविध चवींमध्ये खोबऱ्याचे सारण

मोदकांमध्ये चॉकलेट, सुका मेवा, केशर, वेलची, आंबा मोदक असे विविध चवींचे मोदक उपलब्ध आहेत. अशातच यंदा चॉकलेट मोदकांमध्ये खोबऱ्याचे सारण भरून मोदक तयार केल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.