Mahayuti : ठाणे : ठाणे जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटासोबत युती करण्याऐवजी स्वबळावर निवडणूका लढविण्याची कुजबुज भाजपच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून केली जात असताना, आता भाजपचे नेते तथा वन मंत्री गणेश नाईक यांनीही एकप्रकारे त्यास दुजारो दिल्याचे दिसते. महायुतीत लढावे असे सर्वांचे म्हणणे आहे. परंतु काही बाबतीत स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतल्या जातील असे नाईक म्हणाले. तसेच एखाद्या पक्षास महायुतीमध्ये लढून अन्याय वाटत असेल तर त्या पक्षाला वेगळे लढण्याची मूभा दिली पाहिजे असेही नाईक म्हणाले.
गेल्याकाही वर्षांमध्ये ठाणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात भाजपचे वर्चस्व वाढत असल्याचे चित्र आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघापैकी भाजपने ९ जागांवर उमेदवार उभे केले होते. या सर्व जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. तर शिंदे गटाला ७ पैकी ६ जागांवर विजय मिळविता आला होता. जिल्ह्यात शिंदे यांची शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवले होते. गणेश नाईक यांनी अनेकदा शिंदे गटावर टीका देखील केली. तसेच जिल्ह्यात भाजपच क्रमांक एकचा पक्ष असल्याचे भाषणात उल्लेख केले आहेत.
दरम्यान, गणेश नाईक यांनी शुक्रवारी ठाण्यात तिसऱ्यांदा जनता दरबार भरविला होता. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संंवाद साधला. महापालिका निवडणूकीमध्ये महायुतीबाबत त्यांना विचारले असता, नवी मुंबई, उल्हासनगर, भाईंदरमध्ये भाजप एक क्रमांकावर आहे. पालघर जिल्हा परिषद भाजपची आहे. तेथील आमदार मित्रपक्षाचे आहेत, पण खासदार भाजपचे आहेत. त्यामुळे त्याठिकाणी प्राबल्य भाजपचे आहे. शिंदे यांच्या शिवसेनेने, राष्ट्रवादीने देखील प्रयत्न केले पाहिजे. महायुतीत लढावे असे सर्वांचे म्हणणे आहे. परंतु काही बाबतीत स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतल्या जातील असे नाईक म्हणाले. तसेच, एखाद्या पक्षाला अन्याय होणार असेल तर त्यांना वेगळे लढण्याची मुभा दिली पाहिजे असेही ते म्हणाले.
लवकरच कोंडी सुटेल –
वाहतुक कोंडीविषयी गणेश नाईक यांना विचारले असता, राज्यात सर्वच ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. पूर्वी कमी वजनाच्या गाड्या होत्या परंतु आता १०० टन वजनाच्या गाड्या निघाल्या आहेत. त्यामुळे रस्ता भार वाहून नेण्यासाठी सक्षम राहिलेला नाही. नवीन रस्ते तयार होत असून या समस्येवर मात केली जाईल असे नाईक म्हणाले.