ठाणे : एकनाथ शिंदेंना लाॅटरी लागली, असे विधान वनमंत्री व भाजपचे नेते गणेश नाईक यांनी केले होते. त्यावर शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रीया देताना नाईक यांच्यावर टिका केली होती. यावरून वाद रंगला असतानाच आता या वादात नवी मुंबईतील शिंदेच्या शिवसेनेचे नेते विजय चौगुले यांनी उडी घेतली आहे. त्यांनी नाईक यांच्यावर सडकून टिका केली आहे.

पालघर येथे १५ ऑगस्टला एका शासकीय कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईक यांनी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांच्या बाबत मत व्यक्त केले होते. “प्रत्येकाचे नशीब असते, लाॅटरी लागते की नाही. एकनाथ शिंदेंना लाॅटरी लागली, त्याचा आनंद आहे. पण कमविलेले टिकविता आले पाहिजे, असे माझे मत आहे. कसे कमविले, किती कमविले आणि कसे टिकविले यावर जनसामान्यांची नजर असते” असाही उल्लेख नाईक यांनी केला होता. या वक्तव्यावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आता नाराजी व्यक्त केली जात आहे. शिंदे गटाचे ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी गणेश नाईक यांच्यावर टीका केली. “ लॉटरी कोणाला लागली? याचे आत्मपरीक्षण गणेश नाईक यांनी करावे. ‘साठी बुद्धी, नाठी’ असे म्हणतात, त्यांचे वय झाले आहे, त्यामुळे ते काय बोलतात हे त्यांना माहीत” असे म्हस्के म्हणाले होते.

नाईकांनी दिले होते प्रतिउत्तर

नरेश म्हस्के यांनी वयासंबंधी केलेल्या टिकेला गणेश नाईक यांनी रविवारी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना प्रतिउत्तर दिले होते. “वयाचा नंबर हा एक बहाणा असतो. कार्यक्षम असतो तो कायमच दिसतो. त्यामुळे भविष्यात हे दाखवून देऊ” असा पलटवार नाईक यांनी केला होता. असे असतानाच या वादात आतानवी मुंबईतील शिंदेच्या शिवसेनेचे नेते विजय चौगुले यांनी उडी घेतली आहे. त्यांनी नाईक यांच्यावर सडकून टिका केली आहे.

चौगुले काय म्हणाले

वनमंत्री गणेश नाईक आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते विजय चौगुले हे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. चौगुले हे नाईकांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यातच नाईकांनी पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केल्याने चौगुले हे सुद्धा मैदानात उतरले आणि त्यांनी नाईकांवर टिकेचे बाण सोडले. “ मुकेश अंबानी हे मध्ये पडले नसते तर, यांची (गणेश नाईक) लाॅटरी लागली नसती”, अशी टिका विजय चौगुले यांनी केली आहे. या टिकेला उत्तर देताना “मी काही नाकारत नाही. सर्वांच्या आर्शीवादाने मिळाले” असे गणेश नाईक म्हणाले. यामुळे हा वाद आता दिवसेंदिवस रंगताना दिसून येत आहे.