ठाणे – पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिकेच्या पुढाकाराने शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्याचे शालेय विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व जनजागृती उपक्रम ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील काही शाळांसाठी गेली अनेक वर्ष राबविण्यात येत आहे. मात्र यंदाच्या कार्यशाळा विशेष ठरत आहे. विविध भाषिक मुलांच्या शाळा तसेच प्रामुख्याने मुस्लिम बहुल भागांतील शाळा याठिकाणी यंदा कार्यशाळा सुरु करण्यात आल्या आहेत. येथील मुले ही हिरहिरीने यात सहभाग घेत असून त्यांच्या कुटुंबियांचाही बाप्पाची मूर्ती घडविण्यात हातभार लागत आहे. यामुळे या कार्यशाळांनी धार्मिक हेवेदावे, विवाद बाजूला सारत गणेशोत्सवाला खऱ्या अर्थाने सामाजिक सलोख्याचे प्रतीक बनविले आहे.

मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या ठिकाणी गणेशोत्सव अधिक उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्याचे प्रमाण हे अधिक आहे. ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सव साजरा केला जाणार असून सर्व मंडळांकडून आणि घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांकडून हळूहळू तयारी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिकेच्या पुढाकाराने शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्याचे शालेय विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व जनजागृती उपक्रम ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील काही शाळांसाठी दिनांक १ जुलै २०२५ पासून राबविण्यात येत आहेत.

पर्यावरण शिक्षण, संशोधन आणि जनजागृती या क्षेत्रात गेली २६ वर्षे कार्यरत असलेली पर्यावरण दक्षता मंडळ संस्था विविध उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्य करीत आहे. संस्थेच्या ‘पालवी’ उपक्रमातंर्गत पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्यासाठी विविध स्तरांवर जनजागृती केली जाते. याच उपक्रमांतर्गत पर्यावरण शाळा प्रकल्पाच्या माध्यमातून गेली २० वर्षे शालेय स्तरावर, गृहसंकुले आणि कंपन्यांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम राबवले जात आहेत. या कार्यक्रमांमध्ये कागद, कापड वापरून मखर बनवण्याचे मार्गदर्शन, निर्माल्य वेगळ ठेवणे आणि व्यवस्थापन, मातीपासून गणेशमूर्ती बनवणे व घरच्या घरी विसर्जन, विसर्जनानंतर शाडू मातीचे पुनर्वापर व्यवस्थापन या विषयांवर माहिती दिले जाते. गेल्या १५ दिवसात ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील २० शाळा मधील २५०० पेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव प्रात्यक्षिक व जनजागृती उपक्रमामध्ये सहभाग घेतला आहे.

ठाण्यातील शाळासोबतच विशेषतः मुंब्रा, डायघर, खर्डी, दिवा, बाळकूम, ओवळा या परिसरातील शाळांनी सहभाग नोंदवला. या ठिकाणी शाळांमध्ये विविध भाषी विद्यार्थी देखील शिक्षण घेत आहे. येथील विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग घेतला. तर मुंब्रा या मुस्लिम बहुल भागातील बी. एस. जोंधळे शाळेतील तसेच डायघर येथील ठाणे महानगरपालिकेची शाळा क्रमांक ८१ शाळेतील विद्यार्थ्यांनी घरी जाऊन कुटुंबियांच्या मदतीने मूर्ती घडवली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

”आपला बाप्पा आपण बनवा” या संकल्पनेलापूरक कृती शालेय विद्यार्थ्यांकडून होत आहे हे दिसते. विद्यार्थ्यांनमध्ये झालेली हि जाणीव यावर्षी तसेच भविष्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने हितकारक आहे. – पौर्णिमा शिरगावकर, प्रकल्प व्यवस्थापक, पर्यावरण दक्षता मंडळ