लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील पाथर्ली शेलार नाका भागातील कुख्यात गुंड गणेश बाळु अहिरे उर्फ गटल्या याला तडीपार करुनही तो चोरुन लपून डोंबिवलीत येऊन गुन्हेगारी कारवाया करत असल्याने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशावरून गणेश अहिरे उर्फ गटल्या याला एक वर्षासाठी नाशिक येथील मध्यवर्ति तुरुंगात स्थानबध्द करण्यात आले आहे.
रामनगर पोलिसांनी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशानंतर गणेश अहिरे याला ताब्यात घेतले. त्याला आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नाशिक येथील कारागृहात एक वर्षासाठी स्थानबध्दतेच्या कार्यवाहीसाठी घेऊन गेले. गटल्यावर तुरुंगातील स्थानबध्दतेची कारवाई झाल्याने शेलार नाका भागातील रहिवासी, व्यावसायिक, पादचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
गटल्यावर डोंबिवली परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये शिवीगाळ, घातक शस्त्र जवळ बाळगणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, शस्त्राचा आधार घेऊन दंगा करणे, शांततेचा भंग करणे असे एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर शस्त्रास्त्र प्रतिबंध कायद्याचे पाच गुन्हे दाखल आहेत. याशिवाय संघटित गुन्हे कायद्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती. गणेश अहिरेवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तरीही तो शेलार नाका परिसरात आपल्या गुन्हेगारी कारवाया करत होत्या. त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त होते. गटल्याच्या वाढत्या कारवायांमुळे गेल्या वर्षी त्याला १८ महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले होते.
तडीपारी आदेशाचा भंग करून, पोलिसांची नजर चुकवून गणेश अहिरे डोंबिवली शेलार नाका भागात येऊन नागरिकांना त्रास देत होता. गटल्याच्या वाढत्या हालचालींमुळे शेलार नाका भागातील नागरिक, व्यावसायिक यांचे जीवन धोक्याचे झाले होते. रात्रीच्या वेळेत तो दंगा करून सार्वजनिक शांततेचा भंग करत होता. त्याच्या या गुन्हेगारी कारवाया वाढत गेल्याने रामनगर पोलिसांनी गणेश बाळू अहिरे उर्फ गटल्या याला संघटित गुन्हेगारी कायद्याने अटक करून नाशिक तुरुंगात एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यासाठीचा प्रस्ताव साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, पोलीस उपायुक्त झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्त डुंबरे यांना पाठविण्यात आला होता.
गटल्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्याचा नागरिकांना होणारा त्रास विचारात घेऊन पोलीस आयुक्त डुंबरे यांनी गणेश अहिरे याला एक वर्षासाठी संघटित गुन्हेगारी कायद्याने एक वर्षासाठी स्थानबध्द करण्याचा आदेश दिला. रामनगर पोलिसांनी तातडीने या आदेशाची अंमलबजावणी केली. त्याची रवानगी नाशिक तुरुंगात केली. डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यातर्फे गेल्या वर्षभरात पोलीस अभिलेखावरील कुख्यात चार मोक्का, दोन संघटित गुन्हेगारी, ११ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. यामधील तेरा आरोपी हे तुरुंगात आहेत. आतापर्यंत एकूण १० जणांवर मोक्काची कारवाई, दोन जण स्थानबध्द आहेत. २४ आरोपी तुरुंगात पाठविण्यात आले आहेत.
नागरिकांना आवाहन
रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील कोणत्याही भागात कोणीही इसम दिवसा, रात्री दहशत, हाणामारी, शांतेतचा भंग करणे, शस्त्राचा वापर करून दहशत पसरवित असतील तर नागरिकांनी अशा इसमांची माहिती रामनगर पोलिसांना देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.