१५० किमीच्या परिसरातील रहिवाशांना फायदा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गॅस सिलिंडरच्या ने-आणीतील दगदग आणि त्याचे वाढते दर याला पर्याय म्हणून पसंती मिळवत असलेली वाहिनीद्वारे गॅसपुरवठय़ाची योजना आता ठाणे जिल्ह्यात आणखी विस्तारणार आहे. डोंबिवली ते अंबरनाथ या शहरांतील सुमारे २७ हजार ग्राहकांपर्यंत पोहोचत असलेला पाइपद्वारे गॅसपुरवठा आता उर्वरित कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यासाठी महानगर गॅस कंपनीने कंबर कसली आहे. येत्या काळात या शहरांतील १५० किमीच्या परिघात ‘पाइपगॅस’चा विस्तार करण्यासाठी कंपनीने हालचाली सुरू केल्या आहेत.

अंबरनाथ ते डोंबिवली या पट्टय़ात २६ हजार ५०० घरगुती तर ३८ वाणिज्य व्यावसायिक महानगर गॅसच्या वाहिनीसुविधेचा सध्या लाभ घेत आहेत. २०११ पासून महानगर गॅसने अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, कल्याण, ठाकुर्ली, टिटवाळा आणि डोंबिवली परिसरात स्टील ट्रक पाइप लाइन आणि पॉलिथेलीन पाइप लाइनद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यासाठी जाळे उभारण्याचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत अंबरनाथ ते कल्याण भागात ५० किलोमीटरच्या पट्टय़ात पाइप लाइनद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या भागात येणाऱ्या काळात १५० किलोमीटर लांबीच्या पट्टय़ात गॅस पुरवठय़ाचे जाळे विस्तारण्यात येणार आहे, असे महानगर गॅसच्या उपमहाव्यवस्थापक नीरा अस्थाना-फाटे यांनी सांगितले.

कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरातील चार लाख रहिवासी मिश्र वस्तीत राहतात. काही रहिवासी चाळी, काही उंच इमारती तर काही बंगल्यांमध्ये राहत आहेत. या परिसराचा काही भाग उंचावर, काही खडकावर तर उंच सपाटीवर वसलेला आहे. अशा भागात गॅस वाहिन्या टाकताना मोठे आव्हान उभे राहत आहे, असे महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, तरीही पाइप गॅसचे जाळे विस्तारण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gas pipeline extension from dombivli to ambernath
First published on: 13-09-2017 at 03:24 IST