ठाणे – पतीकडून आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या मानसिक आणि शारिरीक छळाच्या विरोधात आतापर्यंत महिलांसाठी अनेक मार्गदर्शन शिबिरे, महिला आयोगाकडून कायदेशीर मार्गदर्शन आणि मदत यांसारख्या गोष्टींचे आयोजन होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. मात्र आता पत्नीपीडित पुरुषांसाठी राज्यस्तरावर काम करणाऱ्या पुरुष स्वाभिमानी फाउंडेशन तर्फे उल्हासनगर मध्ये महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. याठिकाणी पत्नीपीडित पुरुषांसाठी कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन देण्याबरोबरच पुरुष आयोग स्थापन करावा यासाठी मागणी देखील करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे. येत्या १३ सप्टेंबर २०२५ रोजी उल्हासनगर – ४ येथील शिवलीला गाजरे सभागृहात हा मेळावा पार पडणार आहे.
महिलांप्रमाणेच अनेक पुरुषही वैवाहिक आयुष्यात गंभीर त्रासाला सामोरे जात आहेत. मात्र समाजात किंवा व्यवस्थेमध्ये या पुरुषांच्या वेदना, छळ, अन्याय याबाबत फारशी चर्चा होत नाही. आज अनेक पुरुष खोट्या कौटुंबिक तक्रारींचा बळी पडत आहेत. मानसिक त्रास, पत्नीच्या नातेवाईकांकडून पोटगीसाठीचा दबाव, मुलांपासून जबरदस्तीने दूर ठेवणे, आत्महत्येस प्रवृत्त करणारा छळ, खोटे गुन्हे दाखल करून करण्यात येणारी बदनामी, वैवाहिक दुरावा, वैचारिक कलह आणि सामाजिक अपमान या साऱ्याचा सामना पुरुष करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर पुरुष स्वाभिमान फाउंडेशन या राज्यस्तरीय संघटनेतर्फे पत्नीपीडित पुरुषांसाठी एक भव्य राज्यस्तरीय महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा महामेळावा येत्या १३ सप्टेंबर २०२५ रोजी उल्हासनगर-४ येथील शिवलीला गाजरे सभागृहात पार पडणार आहे. यात महाराष्ट्रातील विविध भागांतील पत्नीपीडित पुरुष, कायदेतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनेचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. मेळाव्याचे यंदाचे हे तिसरे वर्ष असून याआधी नाशिक, दिल्ली यांसारख्या ठिकाणी संघटनेतर्फ़े मेळावे घेण्यात आले आहेत.
या मेळाव्यात कायदेशीर बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार असून, खोट्या आरोपांपासून बचाव करण्यासाठी काय उपाय आहेत, पोलिस आणि न्यायालयीन प्रक्रियेत कोणती काळजी घ्यावी, पुरुषांनी स्वतःच्या हक्कासाठी कसा आवाज उठवावा, यावर सखोल चर्चा होणार आहे. मानसिक आधारासाठी समुपदेशन सत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे. महिलांसाठी महिला आयोग, बालकांसाठी बाल हक्क आयोग फक्त पुरुषांसाठी कोणतीही कायदेशीर आयोग अथवा रचनात्मक संस्था नाही. त्यामुळे ‘पुरुष आयोग’ स्थापन करावा ही या मेळाव्याची मुख्य मागणी राहणार आहे. पुरुषही माणूस आहे, त्याचाही आवाज आहे, त्यालाही भावना आहेत वैवाहिक नात्यांतील अन्याय आणि छळाविरुद्ध लढण्याचा अधिकार आहे,” अशी प्रतिक्रिया संघटनेचे पदाधिकारी बालाजी डोर्नपल्ले यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.