ठाणे- शहरात पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पहिले महाअधिवेशन आणि प्रदर्शन भरविण्यात आले आहे. शुक्रवारपासून सुरु झालेले हे अधिवेशन आणि प्रदर्शन नागरिकांसाठी रविवार २९ डिसेंबरपर्यंत ठाण्यातील उपवन मैदानात खुले असणार आहे. गृहनिर्माण संस्थांशी संबंधित विविध विषयांवरील स्टॉल या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत. तर, शनिवारी गृहनिर्माण संस्थांसंबंधित विविध विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली.

ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग ठाणे जिल्हा आयोजित सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पहिले महाअधिवेशन आणि प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले. या महाअधिवेशनातील प्रदर्शनात गृहनिर्माण संस्थासाठी उपयुक्त ठरणाऱ्या वेगवेगळ्या व्यावसायिकांचे स्टॉल्स, विकासक, अर्थसाह्य करणाऱ्या संस्था उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सौर ऊर्जेचा वापर करुन वीज निर्मिती, रेन वॉटर हॉर्वेस्टींग, पाण्याचे व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन असे विविध गृहनिर्माण संस्थांशी संबंधित असलेल्या संस्थांचे ५६ स्टॉल्स नागरिकांसाठी खुले आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाला राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक, फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, जिल्हा उपनिबंधक डॉ. किशोर मांडे, परिवहन सदस्य विकास पाटील, संचालक हिंदुराव गळवे, शैलजा गस्ते, संतोष साळुंखे, विनोद देसाई उपस्थित होते.

हेही वाचा – लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत

सौर पॅनेल आणि चार्जींग स्टेशनसाठी निधी देणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भविष्याचा वेध घेऊन त्यांच्या मनातील पर्यावरणपूरक भारत उभारत आहेत. याची सुरुवात ई – वाहनांपासून केली असल्याने भविष्य हे ईलेक्ट्रीक वाहनांचे आहे. त्यामुळे भविष्यात सोसायट्यामध्ये ईलेक्ट्रीक वाहनांची संख्या वाढणार आहे. यासाठी आमदार निधी अथवा अन्य निधीतुन सोसायट्यांमध्ये सौर पॅनेल आणि चार्जींग स्टेशन उभारण्यात येतील, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

गृहनिर्माण संस्थांना दिशा देणारे महाअधिवेशन – संजय केळकर

शहरांमधील वाढत्या नागरीकरणासह गृहसंकुले वाढत असून गृहनिर्माण संस्थाचे प्रश्न वाढत आहेत. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांना दिशा देण्यासाठी अशा प्रकारचे महाअधिवेशन गरजेचे आहे. हे अधिवेशन म्हणजे एक प्रकारची कार्यशाळा असून याद्वारे गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींचे प्रबोधन होणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयामधे अशा प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया आमदार संजय केळकर यांनी दिली.

हेही वाचा – डोंबिवलीजवळील खोणी गावात बाहेरील मुस्लिमांना नमाजास बंदी, गैरप्रकार टाळण्यासाठी ग्रामस्थांचा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या विषयांवर तज्ज्ञांकडून उद्या मार्गदर्शन

ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पहिल्या महाअधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी गृहनिर्माण संबंधित विविध विविध विषयांवर चर्चा सत्र आयोजित करण्यात आला यामध्ये ‘सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन’या विषयावर डॉ. किशोर मांडे, ‘पुनर्विकास स्वयंपुनर्विकास, समस्या आणि समाधान’ याविषयावर ॲड. अक्षय पुराणिक, ‘गृहनिर्माण संस्थांचे लेखापरिक्षण’ या विषयावर राजेश जाधवार, ‘निवडणूक प्रक्रिया ई-वर्ग’या विषयावर राजेश लव्हेकर, डिम्ड कन्व्हेन्स, शिक्षण – प्रशिक्षण या विषयावर सिताराम राणे, स्वयंपुनर्विकास, पुनर्विकास, आवश्यक बाबी आणि सादरिकरण या विषयावर वास्तुविशारद मकरंद तोरसकर आणि ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता रविशंकर शिंदे तर, स्वयंपुनर्विकास कर्ज सुविधा या विषयावर ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे अध्यक्ष राजेंद्र पाटील मार्गदर्शन करणार आहेत.