अंतर्गत जलवाहतूक, वाहतूक सुधारणा प्रकल्पांसाठी २०० कोटींची मदत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे शहरातील परिवहन बससेवेचा बोजवारा आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडी यांमुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांना भविष्यात जलद आणि सुलभ प्रवासाचा अनुभव घेता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाण्यातील खाडीकिनाऱ्यांच्या विकासासाठी पालिकेने आखलेल्या संवर्धन प्रकल्पाला भरीव आर्थिक मदत देण्याचे आश्वासन देतानाच अंतर्गत जलवाहतुकीसाठी प्रवासी बंदरांची उभारणी करण्यासाठी आवश्यक मदत करण्याची तयारी केंद्र सरकारने दर्शवली आहे. त्यासोबतच ठाण्यातील तीन हात नाका, नितीन कंपनी आणि कॅडबरी जंक्शन या मुख्य मार्गावर वाहतूक सुधारणा प्रकल्प राबवण्यासाठी दोनशे कोटी रुपयांचे अर्थसाह्य करण्यासही केंद्र सरकारने तत्त्वत: मंजुरी दिली आहे, अशी माहिती पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पत्रकारांना दिली.

ठाण्यातील वाढती वाहनसंख्या आणि सार्वजनिक प्रवासी वाहतूक साधनांची कमतरता यामुळे ठाणेकरांना दररोज हालअपेष्टा सोसत प्रवास करावा लागत आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अलीकडच्या काळात वाहतूक व्यवस्थेत बदल घडवणाऱ्या काही योजना कागदावर आणल्या आहेत. त्यामध्ये खाडीकिनाऱ्यांचा विकास करताना ठाण्यात अंतर्गत प्रवासी जलवाहतूक सुरू करण्याचीही योजना आहे. विस्तीर्ण खाडीकिनारा लाभलेल्या ठाणे शहरासह मीरा-भाईंदर, नवी मुंबई या शहरांना अशा प्रकारे जोडून प्रवाशांना जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध करण्याचा प्रस्ताव पालिकेने आखला आहे. याचसंदर्भात पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नुकतीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी खाडीकिनारा विकास प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी गडकरी यांनी अंतर्गत जल वाहतुकीचा प्रस्ताव तयार करून मुंबई मेरिटाइम बोर्ड यांच्यामार्फत  केंद्र शासनाला सादर करावा, अशा सूचना यावेळी दिल्या. तसेच अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पांतर्गत प्रवासी बंदर बांधण्यासाठी प्रत्येकी १० कोटीपर्यंत केंद्र शासनाकडून अर्थसाहाय्य मिळू शकेल, असेही गडकरी यांनी स्पष्ट केल्याची माहिती जयस्वाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

या बैठकीतच जयस्वाल यांनी ठाण्यातील वाहतूक सुधारणा प्रकल्पाचा आराखडाही गडकरी यांच्यासमोर मांडला. पूर्व द्रुतगती मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३चा भाग असल्याने या मार्गावर तीन हात नाका, नितीन कंपनी आणि कॅडबरी जंक्शन येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने बृहत आराखडा तयार करून केंद्र शासनाला सादर केल्यास त्यास राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाकडून अर्थसाहाय्य करण्यात येईल, असे आश्वासनही गडकरी यांनी दिल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पांसाठी केंद्र शासनाकडून अंदाजे २०० कोटी रुपयांपर्यंतचे अर्थसाहाय्य अभिप्रेत असल्याचे ते म्हणाले.

दिल्ली दौऱ्यादरम्यान ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्यासोबत केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतल्याचेही जयस्वाल म्हणाले. जावडेकर यांच्यासमोरही खाडीकिनारा विकास प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले व या प्रकल्पासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या केंद्र शासनाकडून मिळाव्यात यासाठी विनंती करण्यात आली. याबाबत महापालिकेने केंद्रीय पर्यावरण विभागास रीतसर प्रस्ताव सादर केल्यास त्याबाबत निर्णय घेतला जाईल असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Get 200 crore internal navigation transport development projects
First published on: 22-12-2015 at 03:25 IST