ठाणे – घोडबंदर येथील पातलीपाडा पुलावर मंगळवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास एका ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या अपघातात ट्रक चालक विनोद ( ४२ ) आणि सहाय्यक रहीम पठाण ( २५) या दोघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे पातलीपाडा पुलावरील दोन्ही वाहिन्यांची वाहतूक सुमारे तीन तास बंद करण्यात आली होती. ही वाहतूक सेवा रस्त्यावरून धिम्या गतीने सुरू होती.

ट्रकचालक विनोद आणि सहाय्यक रहीम पठाण हे दोघे उत्तर प्रदेशचे रहिवासी होते. हे दोघे मंगळवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास ट्रकमध्ये सुमारे ८ टन लोखंडी पाईप आणि रॉड घेऊन नवी मुंबईहून गुजरातच्या दिशेने वाहतूक करत होते. त्यांचा ट्रक घोडबंदर येथील पातलीपाडा पुलावर येताच ट्रक चालक विनोद याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक थेट रस्त्यावरील दुभाजकात असलेल्या स्ट्रीट लाईट पोलवर आदळला. या अपघातात ट्रकमध्ये असलेले सुमारे ८ टन लोखंडी पाईप आणि रॉड रस्त्यावर विखुरले होते. तर, ट्रकचा चालक विनोद आणि सहाय्यक रहीम पठाण हे दोघेही जखमी अवस्थेत वाहनात अडकले होते.

या अपघाताची माहिती मिळताच, ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी कर्मचारी,अग्निशमन दलाचे जवान आणि ठाणे शहर वाहतूक पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी विनोद आणि सहाय्यक रहीम पठाण या दोघांना वाहनातून बाहेर काढण्यात आले. तत्काळ रुग्णवाहिकेतून त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्या दोघांना मृत घोषित केले.

या अपघातानंतर घटनास्थळी २ हायड्रा मशीन, अग्निशमन दलाची फायर आणि रेस्क्यू वाहने, पोलीस कर्मचारी आणि खाजगी रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. रस्त्यावर विखुरलेले लोखंडी पाईप व रॉड हायड्राच्या सहाय्याने एका बाजूला करण्यात आले.

या अपघातामुळे पातलीपाडा पुलावरील दोन्ही वाहिन्यांची वाहतूक सुमारे तीन तास बंद ठेवावी लागली होती. या कालावधीत वाहतूक सेवा रस्त्यावरुन धीम्या गतीने सुरू होती. अपघातग्रस्त ट्रक सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनंतर रस्त्याच्या बाजूला हलवण्यात आला. ट्रक हटवल्यानंतर घोडबंदर रोड पुन्हा वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा करण्यात आला, अशी माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अपघातामुळे ट्रकमधून रस्त्यावर तेल सांडल्याने घसरट परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनी होज पाइपद्वारे पाणी मारून रस्ता स्वच्छ केला. सध्या रस्ता वाहतुकीसाठी पूर्णतः खुला करण्यात आला आहे.