ठाणे : ठाण्यातील घोडबंदर भागात अनेकांचे गृह खरेदीचे स्वप्न असते. जो घोडबंदर भाग पूर्वी जंगलाने वेढलेला होता. त्या भागात आता विकासाच्या नावाखाली विविध प्रकल्प आणले जात आहेत. ३० ते ४० मजल्याच्या इमारती उभ्या राहत आहेत. पंरतु या सर्वांचे दुष्परिणाम आता घोडबंदर पट्ट्यात दिसू लागले आहे. अवघ्या २४ तास पडलेल्या पावसामुळे घोडबंदर रोड जलमय झाला. येथील गायमुख, कासारडवडवली, पातलीपाडा, वाघबीळ, चितळसर अशा अनेक ठिकाणी पाणी साचले होते. कोट्यवधी रुपयांची गृह खरेदी केलेल्या नागरिकांना अक्षरश: चिखल तुडवित, साचलेल्या पाण्यातून त्यांच्या गृहसंकुलात जाण्याची वेळ आली. त्यामुळे घोडबंदरचा विकास होत आहे की, विकासाच्या नावाखाली घोडबंदर भकास होत आहे असा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे.

घोडबंदर मार्गाच्या एका दिशेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तर दुसऱ्या दिशेला विस्तीर्ण पसरेली ठाणे खाडी आहे. मुंबई, ठाण्यातील मोठ्या विकासकांनी या भागात गृहसंकुले निर्माण केली. नागरिकरण वाढू लागल्यानंतर वडाळा-घाटकोपर-कासारवडवली (मेट्रो चार), कासारवडवली ते गायमुख (मेट्रो चार अ) या प्रकल्पांची कामे सुरु झाली. विकासकांनी याचाच गैरफायदा घेत, मेट्रो, निसर्गाच्या सानिध्यात घरांची स्वप्ने दाखवून त्यांच्या सदनिका कोट्यवधी रुपयांना विक्री करण्यास सुरुवात केली. स्वप्नातील घर घोडबंदर भागात असावे असा विचार करुन अनेकांनी कोट्यवधी रुपये मोजून या भागात गृहखरेदी केली.

ठाण्यात सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या पावसामुळे या भागात मोठ्याप्रमाणात पाणी साचले आणि येथील परिस्थिती नागरिकांच्या समोर आली. येथील चेना पूल भागात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ओढ्यांमधून निघणारे पाणी रस्त्यावर साचले होते. कंबरे इतके पाणी साचून संपूर्ण भाग जलमय झाला होता. अनेक वाहने या पाण्यामध्ये अडकून होती. त्यामुळे घोडबंदर भागातून मिरा भाईंदर किंवा तेथून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्यांचा प्रवास जीवघेणा झाला होता. येथून गरज नसल्यास वाहतुक करु नका असे सांगण्याची वेळ पोलीस प्रशासनावर आली.

घोडबंदर येथील पातलीपाडा, मानपाडा भागात देखील अशीच स्थिती निर्माण झाली होती. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) मेट्रो कामासाठी आणि सेवा रस्ता मुख्य रस्त्यामध्ये जोडण्यासाठी रस्त्यांची खोदकामे केली जात आहेत. त्यामुळे पूलाखाली पाणी साचले होते. वाघबीळ भागात मलनि:स्सारण वाहिन्यांचे पाणी रस्त्यावर साचल्याने वाघबीळ गावात जाणारा मार्ग जलमय झाला होता. अनेक गृहसंकुलाच्या बाहेर चिखल, पाणी साचले होते. त्यामुळे पायी जाणाऱ्या नागरिकांचे हाल झाले. याबाबत पर्यावरणवादी आणि येथील स्थानिकांना विचारले असता, अनेक नैसर्गिक प्रवाह बंद झाल्याने हा परिणाम घोडबंदर मार्गावर होत असल्याचे त्यांनी सांगितले.चौकट

घोडबंदर भागात पूर्वी जंगल होते. या भागात आता काँक्रीटीकरण वाढू लागले आहे. नाले, नैसर्गिक प्रवाह बुजवून किंवा वळवून तेथे बांधकामे तयार झाली. त्यामुळे पाण्याचा प्रवाह खाडीमध्ये जाण्यासाठी मार्गच शिल्लक नाही. घोडबंदर भागाचे भविष्य आता गंभीर आहे. हवामान बदलामुळे ही स्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक नाले, ओढे कुठे होते याबाबत ठाणे महापालिकेकडे माहिती असते. अनेकदा सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी देऊनही नाले बुजविणाऱ्या विकासकांवर कोणतीही कारवाई झाली नाही. आता खाडी किनारे बुजवून खाडी किनारी विकास प्रकल्प आणला जात आहे. यातील बहुतांश प्रकल्प घोडबंदर भागात आहेत. त्यामुळे आणखी वाईट स्थिती होऊ शकते. या सर्वांना महापालिका जबाबदार आहे. – रोहीत जोशी, पर्यावरणवादी कार्यकर्ते.

घोडबंदरमध्ये माझा जन्म झाला. आम्ही पूर्वी या ठिकाणी शेती करत होतो. मागील काही वर्षांमध्ये घोडबंदर भागात इमारतींची बांधकामे वाढली आणि पाणी साचण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. घोडबंदर भागात मोठ्या प्रमाणात झालेले काँक्रिटीकरण, ⁠विकासकांनी बुजवलेले नैसर्गिक नाले, ⁠सदोष नाले सफाई आणि मलनि:स्सारण वाहिन्या यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. – सागर पाटील, रहिवासी, वाघबीळ.