Thane News : ठाणे : घोडबंदर येथील गायमुख घाट भागात बुधवारी पहाटे अवजड वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात ठाणे वाहतुक शाखेचे पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर वाहतुक कोंडी झाली होती. घोडबंदर घाट, फाऊंटन, नवघर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या घटनेनंतर ठाण्यात अवजड वाहनांच्या बेदरकारपणे वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
घोडबंदर मार्गावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त आहेत. अवजड वाहनांच्या वाहतुकीतून केव्हा सुटका होईल असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दररोज वाहतुक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. नोकरदारांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता येत नाही. अवजड वाहनांना पर्यायी मार्ग नसल्याने ठाणे शहरातून वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांचा मुद्दा आता ऐरणीवर येत आहे. त्यातच घोडबंदर घाट रस्त्याची अवस्था वाईट असल्याने नागरिकांकडून या मार्गाच्या दुरुस्तीचा वारंवार मागणी केली जात असते. त्यातच बुधवारी पहाटे गुजरात येथील वापी भागातून एक कंटेनर घोडबंदर मार्गे न्हावाशेवा बंदराच्या दिशेने निघाला होता. या कंटेनरमध्ये २३ टन वजनाच्या प्लास्टिकच्या बॅगा होत्या. हा कंटेनर गायमुख घाट येथील गायमुख पोलीस चौकीजवळ आला असता, कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी मुंबईहून गुजरातच्या दिशेने १६ टन वजनी यंत्र घेऊन जाणाऱ्या कंटेनरला प्लास्टिक बॅगा वाहून नेणाऱ्या कंटेनरची धडक बसली.
घोडबंदर घाटात कर्तव्यावर असलेले पोलीस नाईक तडवी हे देखील तेथे उभे असताना, त्यांना या अपघातात धडक बसल्याने गंभीर दुखापत झाली. या भीषण अपघाताची माहिती ठाणे वाहतुक पोलीस, ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाली. तडवी यांना उपचारासाठी घोडबंदर भागातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या डाव्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या डाव्या पायाला पाच टाके आणि डोक्याला तीन टाके पडले आहेत.

कंटेनरच्या अपघातामुळे रस्त्यावर मोठ्याप्रमाणात तेल सांडले होते. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी जेट पाईपच्या साह्याने रस्त्यावर सांडलेल्या तेलावर पाणी मारत येथील धोका दूर केला.

या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घोडबंदर घाट, फाऊंटन, नवघर पर्यंत वाहतुक कोंडी झाल्याने कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले.