ठाणे : ठाणे शहरातील घोडबंदर भागात कोट्यवधी रुपयांची घरे खरेदी करुन वास्तव्यास आले, परंतु येथील खड्ड्यांचा जाच रहिवाशांपासून दूर जाताना दिसत नाही. घोडबंदर मार्गावरील प्रत्येक चौक, नाक्यावर खड्डे पडले आहेत. ज्या ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले होते. तिथे देखील पाऊस पडताच पुन्हा खड्डे पडले. काही खड्ड्यांचा आकार डबक्या इतका झाला आहेत. या खड्ड्यांत एखाद्या वाहन चालकाला जीव गमवावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे घोडबंदरची अवस्था ‘खड्डेबंदर’ झाली आहे.
पूर्वी जंगलाने विस्तारलेला घोडबंदर भाग आता इमारतींच्या विळख्यात सापडला आहे. ठाणे शहरात आणि मुंबईपासून जवळचा भाग म्हणून घोडबंदर भागात लाखो रहिवासी राहण्यास आले आहेत. त्यामुळे कासारवडवली पर्यंत सिमीत असलेला घोडबंदर परिसर आता गायमुखच्या टोकापर्यंत गेला आहे. नागरिकरण वाढल्याने त्याचा परिणाम घोडबंदर मार्गावरील वाहतुकीवर होत आहे. उरण येथील जेएनपीटी बंदरातून सुटणारी अवजड वाहने देखील घोडबंदर मार्गाने वसई, गुजरातच्या दिशेने वाहतुक करतात. त्यामुळे हलक्या वाहनांसोबतच अवजड वाहनांचा देखील या मार्गावर भार वाढू लागला आहे.
मागील सात ते आठ वर्षांपासून या मार्गावर मेट्रो चार (वडाळा-घाटकोपर-कासारवडवली) आणि मेट्रो चार अ (कासारवडवली ते गायमुख) प्रकल्पांच्या निर्माणाचे काम सुरु आहे. या कामांसाठी ठिकठिकाणी खोदकामे करण्यात आली. त्यामुळे रस्त्यांची अवस्था वाईट झाली. तसेच घोडबंंदर मार्गावर मागील काही महिन्यांपासून मोठ्याप्रमाणात खड्डे पडू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने खड्ड्यांच्या प्रकरणावरुन आंदोलन केले. प्रशासनाकडून तात्पुरते खड्डे बुजविण्यात आले. परंतु मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा घोडबंदर मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.
येथील मानपाडा ते ओवळा या मार्गावर सर्वच मुख्य चौक, रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. कासारवडवली पूलाजवळील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. मानपाडा चौकाजवळ खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर डोंगरीपाडा येथे बसगाडीचे अर्धे चाक रुतेल इतके मोठे खड्डे पडले आहेत. वाघबीळ, आनंदनगर चौक, आनंदनगर सिग्नल, कासारडवली, ओवळा, आर माॅल या सर्वच महत्त्वाच्या चौकात खड्डे पडल्याने दुचाकी चालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत.
घोडबंदर मार्गावरून दुचाकीने प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले आहेत. मार्गावर सर्वत्र खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताची भिती सतत मनामध्ये असते. – जयेश गवारी, प्रवासी.
घोडबंदर मार्गावरील वाघबीळ उड्डाणपूलावर एक भलामोठा खड्डा पडला होता. या खड्ड्याचा आकार आणि खोली इतकी मोठी होती की, रस्त्यामध्ये टाकण्यात आलेल्या सळया देखील दिसत होत्या. अखेर या खड्ड्याचे छायाचित्र समाज माध्यमावर प्रसारित झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने हा खड्डा बुजविण्याचे काम सुरु केले.