ठाणे – घोडबंदर रस्त्यावरील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, त्यातून तातडीने दिलासा मिळावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. घोडबंदर रोडवरील दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावर जड वाहनांना रात्री १२ नंतरच प्रवेश द्यावा, असे आदेश त्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि वेळे आधीच वाहने सोडल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश ही यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. यामुळे सर्व सामान्य वाहतूकदारांना दिलासा मिळणार आहे.
घोडबंदर येथील वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र होत असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री उशिरा जिल्हा प्रशासन, पोलीस आणि वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक घेतली. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.
घोडबंदर रोड हा ठाणे शहर, मीरा-भाईंदर, पालघर तसेच जिल्हा बाहेर जाणाऱ्या वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे. या रस्त्यावर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. जेएनपीटीहून येणारे कंटेनर ट्रक, जड वाहने, स्थानिक प्रवासी वाहतूक आणि टॅक्सी, रिक्षांचा मोठा ओघ असल्याने यामुळे कायमच येथे कोंडीचे प्रमाण भीषण होते. त्यातच सध्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी मार्ग अरुंद झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीमुळे वेळेवर गंतव्यस्थानी पोहोचणे कठीण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर ठाण्यात रात्री उशिरा झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी, वाहतूक विभाग, पोलिस, महापालिका तसेच जेएनपीटी अधिकाऱ्यांना समन्वय साधून वाहतुकीचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश दिले. तर यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची जबाबदारी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यावर सोपवण्यात आली.
ठाणे वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांना आवश्यकतेनुसार वाढीव मनुष्यबळ तैनात करण्याचे आदेश देण्यात आले. जेएनपीटीकडून घोडबंदरकडे येणाऱ्या वाहनांसाठी रात्री १२ वाजेपर्यंत प्रवेशबंदी ठेवावी, असे निर्देश जेएनपीटीचे व्यवस्थापकीय संचालक उन्मेष वाघ यांना दिले. अहमदाबादकडून येणाऱ्या वाहनांचे नियोजन मीरा-भाईंदर व पालघर पोलिस तसेच जिल्हाधिकारी यांनी एकत्रितपणे करावे, तसेच आच्छाड व चिंचोटी येथे जड वाहनांसाठी तात्पुरत्या पार्किंगची सोय करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या.