आशयघन वैचारिक मते, विविध विषयांची चपखल मांडणी आणि आत्मविश्वासाने भारलेल्या भाषणांनी गुरुवारी ठाण्यात ‘लोकसत्ता’ वक्तृत्व स्पर्धा गाजली. ठाण्यातील शिवसमर्थ शाळेच्या सभागृहात पार पडलेल्या या स्पर्धेत ठाणे जिल्ह्य़ातील ३२ महाविद्यालयांतील ६० हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. प्राथमिक फेरीत मुलींनी बाजी मारत नऊपैकी आठ अंतिम विजेतेपदांवर मोहर उमटवली. नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस व भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहकार्याने होणारी ‘वक्ता दशसहस्रेषु’ ही वक्तृत्व स्पर्धा जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड व तन्वी हर्बल्स यांच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांमध्ये होत आहे.
महाराष्ट्राला दिग्गज फडर्य़ा वक्त्यांची मोठी परंपरा लाभली आहे. या वक्त्यांच्या परंपरेला नव्याने उजाळा देण्याचा प्रयत्न लोकसत्ताने या स्पर्धेच्या माध्यमातून केला आहे, अशी प्रतिक्रिया या वेळी उपस्थित परीक्षक आणि प्रेक्षकांनी दिली. दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय असल्याने त्यावर बोलण्यासाठी तरुणाई उत्सुक होती. ‘आपल्याला नायक का लागतात?’ या विषयावर सर्वाधिक स्पर्धकांनी मते मांडली. पाश्चिमात्य नायकांच्या बरोबरीने देशातील तसेच राज्यातील प्रभावी नेत्यांची परंपरा उलगडून दाखवण्याचा प्रयत्न तरुणांनी केला. भविष्यकाळात प्रत्येक जण स्वत:बरोबरच दुसऱ्यांसाठीही नायक ठरू शकतो, असा विश्वास स्पर्धकांनी जागवण्याचा प्रयत्न केला. समाजामध्ये काहींची भलतीच हवा असते. प्रत्यक्षात ‘तो’ नायक असतोच असे नाही, असे मतही काही तरुणांनी व्यक्त केले.
‘सामाजिक चळवळींचा राजकीय परिणाम’ या विषयावर बोलताना तरुणांनी राजकारण आणि समाजकारण यांच्यातील ऋणानुबंध उलगडले.
ओरडल्याशिवाय न्याय मिळत नाही, त्यामुळे चळवळी जन्माला येतात आणि याच चळवळीतून राजकारण जन्माला येत असते. त्यामुळे राजकारण आणि समाजकारण हे एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. ‘जगण्याचे मनोरंजनीकरण’ या विषयावर सद्यकाळातील परिस्थितीचा वेध स्पर्धकांनी घेतला.
प्रा. प्रदीप ढवळ, प्रा. मीनल सोहनी, अरुंधती भालेराव आणि प्रा. अरुण मैड यांनी या वेळी परीक्षक म्हणून काम पाहिले. याप्रसंगी एलआयसीचे प्रतिनिधी संजय मोरे उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राथमिक फेरी निकाल, ठाणे</strong>
पूजा भरत शृंगारपुरे – दत्ता मेघे महाविद्यालय, डोंबिवली
कृतिका कैलास चौधरी – बिर्ला महाविद्यालय, कल्याण<br />रिद्धी प्रसाद म्हात्रे – पिल्लई महाविद्यालय, पनवेल
उत्कर्षां हरिश्चंद्र सारंग – एनसीआरडीएस फार्मसी महाविद्यालय, पनवेल
तेजश्री अनिल मेहेर – केबी महाविद्यालय, एरोली
किन्नरी संजय जाधव – जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे
मनोज नागरे – बिर्ला महाविद्यालय, कल्याण
मानसी सुभाष जंगम – जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे
श्रेया अनिल केळकर – जेएसएम महाविद्यालय, अलिबाग

नागपूर केंद्राचा निकाल
स्पध्रेच्या नागपूर केंद्रावरील प्राथमिक फेरीतून २० वक्त्यांनी विभागीय फेरीत धडक मारली आहे. प्रीती माख (यशवंत विधी महाविद्यालय, वर्धा), प्रशांत ठाकरे व स्वप्नील इंगोले (यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र, एलआरटी महाविद्यालय ), श्रीपाद शिंदे (महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा), सौरभ हटकर (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय), रसिका चिंचोळे (राजीव गांधी अभियांत्रिकी व संशोधन संस्था), श्रीनिधी देशमुख (एलएडी महाविद्यालय), शिवानी श्रीकांत पांडे (निकालस महिला महाविद्यालय), संगीता नक्षिने व सूरज गुरनुले (जनता महाविद्यालय), मोनिका शिरसाट (राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय), श्रध्दा शिवणकर (कमला नेहरू महाविद्यालय), वैभव पंडित (सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय), शुभांगी ओक (केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावती), कृतिका साखे (लालबहादूर विद्यालय, बामनी), सुजीत कुंभारकर (विधी महाविद्यालय नागपूर), प्रियंका डांगरे (न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय, राळेगाव), प्रदीप आरोळे व समिधा नेवारे (प्रियदर्शनी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, नागपूर), वंदना गजीर (महिला महाविद्यालय, नागपूर)

स्पर्धकांच्या प्रतिक्रिया..
‘लोकसत्ता’ची ही स्पर्धा आमच्यासाठी एक सुखद धक्काच होता. ही स्पर्धा खूप आधीच सुरू होण्याची गरज होती. लोकांकिका स्पर्धेनंतर ‘लोकसत्ता’ने आमच्यासारख्या तरुणांचा विचार केला त्याबद्दल आभार
– उत्कर्षां सारंग

व्यक्त होण्यासाठी आवश्यक व्यासपीठ ‘लोकसत्ता’ने उपलब्ध करून दिले. विविध विषयांमुळे चांगला अभ्यास करावा लागला. त्यासाठी नवे संदर्भ, नवी पुस्तके चाळावी लागली. त्यामुळे या स्पर्धेमुळे ज्ञानात भरच पडली.
रिद्धी म्हात्रे

परीक्षकांच्या प्रतिक्रिया..

वक्तृत्व ही एक कला असून भविष्यकाळात महाराष्ट्राला चांगले वक्ते या स्पर्धेच्या निमित्ताने मिळू शकणार आहेत. ठाण्यातील तरुण ध्येयवेडे आहेत हे या स्पर्धेच्या निमित्ताने दिसून आले.
    – प्रा. प्रदीप ढवळ

‘लोकसत्ता’ने निवडलेले विषय अत्यंत चांगले होते. त्यामुळे एका चांगल्या चर्चेत सहभागी झाल्याचा आनंद घेता आला. आपले मनोगत पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. मराठी भाषेवरील विद्यार्थ्यांचे प्रभुत्व या निमित्ताने दिसले.
    – प्रा. मीनल सोहनी

नृत्य, नाटय़ स्पर्धामध्ये स्पर्धकांची मोठी गर्दी दिसून येते. मात्र वक्तृत्वासारख्या स्पर्धाना मोठी गर्दी नसते. असा विषय ‘लोकसत्ता’ने हाताळला ही आनंददायी गोष्ट असून या स्पर्धेत भाग घेतलेले सगळे स्पर्धक अभिनंदनास पात्र आहेत.
    – अरुंधती भालेराव

‘लोकसत्ता’ हे माझे आवडत दैनिक असून त्याचे वाचन आणि त्यामध्ये लिखाण केले. त्यांनी केलेल्या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून आल्यानंतर त्याच्याशी पुन्हा जोडल्याचा आनंद मिळाला.
    – प्रा. अरुण मैड

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girls win in thane loksatta elocution competition
First published on: 23-01-2015 at 01:42 IST