सरकारने ५००-१००० रुपयांच्या जुन्या नोटांच्या वापरावर बुधवारी मध्यरात्रीपासून बंदी आणताच मुंबई, ठाण्यासारख्या बडय़ा शहरांमधील सोने खरेदी बाजारात अभुतपुर्व तेजी अवतरल्याचे चित्र दिसून आले. या जुन्या नोटा वठविल्या जाव्यात यासाठी हातगाईवर आलेल्या खरेदीदारांकरिता दारे खुली करत काही बडय़ा जवाहिऱ्यांनी कोणत्याही शासकीय पुराव्याशिवाय अव्वाच्या सव्वा दराने सोन्याची विक्री सुरु केल्याचे पहायला मिळाले.

ठाण्यातील गोखले मार्गावरील काही बडे व्यापारी जुन्या नोटांचा स्विकार करत एक तोळे सोन्यासाठी थेट ६० हजार रुपयांची दर आकारणी करत असल्याने ग्राहकही भांबावले होते. बुधवारी  रात्री उशीरापर्यत सोने खरेदीचा हा चढा व्यापार बिनदिक्कत सुरु होताच शिवाय उद्या गुरुवारी हाच दर ७० हजार रुपयांचा घरात पोहचेल असा दावाही काही व्यापारी ग्राहकांपुढे करताना दिसले. सोन्याच्या या विक्री व्यवहारातून काही शे कोटी रुपयांचे काळे धन वठविण्यात आल्याची चर्चाही यानिमीत्ताने होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री  घोषणा केल्यानंतर सोने खरेदीवर ग्राहकांच्या उडय़ा पडण्यास सुरूवात झाली. त्यासाठी रात्री उशीरापर्यंत दुकाने खुले ठेऊन ग्राहकांना जुन्या चलनाच्या नोटांवर सोने विक्री केली जात होती. ठाण्यातील सुवर्णकार संघटन आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या वतीने दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र खाजगी आणि बडय़ा सोने विक्रेत्यांनी दिवसभर सोने विक्री सुरू ठेवत मोठय़ाप्रमाणात भाववाढ करण्याचा प्रयत्न केला आहे. सकाळी ३४ हजार तोळे दराने सुरू झालेला भाव दुपार पर्यंत ३८ हजार, ४२ हजार, ५० हजार आणि ६० हजारापर्यंत टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आला होता. ‘लोकसत्ता’चे प्रस्तुत प्रतिनिधींनी शहरातील बडय़ा ज्वेलर्समध्ये जाऊन तेथील सोन्याच्या किमतींची चौकशी केल्यानंतर अधिकृतपणे हा दर वाढवण्यात आल्याचा दावा विक्रेत्यांकडून करण्यात येत होता. दोन लाखावरील सोने खरेदीसाठी पॅनकार्ड आवश्यक असल्यामुळे कुटूंबातील अन्य व्यक्तीच्या नावे सोने खरेदी करण्याचा सल्लाही सोने व्यापाऱ्यांकडून सुचवण्यात येत होता. चेक, डेबीट आणि क्रेडीट कार्डने सोने खरेदी करण्यासाठी ३२ हजारांचा दर आकारला जात होता. त्याच वेळी हजार आणि पाचशे रुपयांची थेट रोख रक्कम घेऊन येणाऱ्या ग्राहकांना ६० हजारांचा दर आकारण्यात आल्याचे चित्र ठाण्यात होते. प्रत्येक दुकानदार नरेंद्र मोदी यांच्या कालच्या घोषणेचा हवाला देत हा दर गुरूवारी थेट ७० हजारापर्यंत पोहचणार असल्याचे सांगत आजच खरेदी करा अशा दावा करत होते.

दोन लाखावरील रोख रकमेवरील खरेदीलाही पॅनकार्ड सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे असे व्यावहार होत असल्यास ते अयोग्य आहे. अनेक बडे सोने व्यापारी वेगवेगळ्या गोष्टींवर खर्च मोठे दाखवून हा फायदा वळता करत असल्यामुले त्यांची मनमानी सुरू आहे. याचा फटका छोटय़ा व्यापाऱ्यांना बसणार आहे.

– कमलेश श्रीमाल, अध्यक्ष ठाणे ज्वेलर्स असोसिएशन