कल्याण – मेल, एक्सप्रेसमध्ये रात्रीच्या वेळेत प्रवासी झोपले की त्यांच्या जवळील, उशाखालील पिशव्या, बटवे चोरून त्यामधील रोख रक्कम, सोन्यासह इतर किमती ऐवज चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला कल्याण आणि मुंबईच्या लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पथकाने चिपळून येथून अटक केली आहे. इंदोर-दौंड एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका वृध्द महिलेच्या उशाखालील ३४ लाख ९८ हजार रूपयांचा ऐवज असलेली पिशवी या चोरट्याने शुक्रवारी चोरली होती. पोलिसांनी तात्काळ तपास करून चोरट्याला अटक केली.

महेश घाग उर्फ विक्की असे सराईत चोरट्याचे नाव आहे. तो मूळचा चिपळूणचा असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. इंदोर-दौंड एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचा ३४ लाख ९८ हजाराचा ऐवज चोरी केल्यानंतर महेश घाग उर्फ विक्की चिपळूण येथे पळून गेला होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १२ तासाच्या आत चिपळूण येथून त्याला अटक केली.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेली माहिती, अशी की गुरूवारी रात्री एक वृध्द महिला इंदोर दौंड एक्सप्रेसने प्रवास करत होत्या. त्यांच्या जवळील पिशवीत रोख रक्कम, सोन्याचा ऐवज असा एकूण ३४ लाख ९८ हजाराचा ऐवज होता. त्या झोपून प्रवास करत होत्या. किमती ऐवज त्यांनी सुरक्षिततेचा विचार करून आपल्या उशाखाली ठेवला होता. शुक्रवारी सकाळी इंदोर एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकात आली. त्यावेळी वृध्देने आपल्या उशाखाली असलेली किमती पिशवी तपासली. त्यावेळी उशाखाली पिशवी नव्हती. त्यांनी एक्सप्रेस डब्यात शोध घेतला पिशवी आढळून आली नाही. त्यांनी तातडीने या चोरीप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली.

कल्याण आणि मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशावरून तातडीने याप्रकरणाचा तपास सुरू केला. कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी केली. या तपासणीत रेल्वे पोलिसांच्या अभिलेखावरील महेश घाग हा गुंड इंदोर एक्सप्रेसमधून कल्याण रेल्वे स्थानकात उतरून घाईने रेल्वे स्थानकाबाहेर जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत विक्कीची माहिती काढली. त्यावेळी तो चिपळूण येथे असल्याचे पोलिसांना समजले. गुन्हे शाखेच्या पोलिसांचे एक पथक तात्काळ चिपळूण येथे विक्कीच्या अटकेसाठी रवाना झाले. चिपळूण भागातून तांत्रिक माहितीच्या आधारे महेश घागला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने इंदोर एक्सप्रेसमध्ये एका महिलेच्या उशाखालील किमती ऐवजाची पिशवी चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. चोरलेली ३४ लाख ९८ हजाराची पिशवी त्याने पोलिसांच्या ताब्यात दिली. पिशवीमध्ये मोती हार, हिऱ्याच्या बांगड्या, रिंग, सोन्याचे घड्याळ, सोनसाखळया, सोन्याच्या रिंग, रोख रक्कम असा ऐवज होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर शिरसाठ, राजेंद्र रानमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर, पोलीस निरीक्षक रोहित सावंत, उपनिरीक्षक सुधाकर सावंत, हवालदार संदीप गायकवाडसह आदी पोलिसांनी अटकेची कारवाई केली.