डोंबिवली : डोंबिवलीतील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तिन्ही कुटुंबामधील कमावते पुरूष गेले आहेत. ही अतिशय दुखद घटना आहे. या तिन्ही कुटुंबीयांना शिवसेनेसह शासनाकडून सर्वोतपरी सहकार्य केले जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटुंबीयांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी रविवारी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांच्या कुटुंबीयांची डोंबिवलीतील घरी जाऊन भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या तिन्ही कुटुंबीयांकडून दहशतवादी हल्ल्यातील घटनाक्रम ऐकताना मन अतिशय हेलावून गेले. अंगावर शहारे आले. आपल्या समोर आपल्या कुटुंबीयांतील सदस्य हल्ल्यात मारला जातो. इतके नृशंस कृत्य दहशतवाद्यांनी केले आहे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
हेमंत जोशी हे माझे पक्के चाहते होते. माझ्याविषयी त्यांना खूप आपुलकी होती, असे त्यांच्या कुटुंबीयांनी मला सांगितले. संजय लेले कुटुंबीय आमचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्या नात्यांमधील आहेत. ही तिन्ही कुटुंबे आमच्या परिवारातील आहेत. त्यामुळे या कुटुंबीयांच्या घरातील मुलांची शिक्षणे, नोकरी इतर ज्या काही अडचणी असतील त्या शिवसेना म्हणून शासन म्हणून सोडविण्यास आम्ही समर्थ आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना आश्वस्त केले आहे. शासन या कुटुंबीयांना सर्वोतपरी सहकार्य करील, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
पाकिस्तानला ज्या भाषेत शिकवणे गरजेचे आहे. त्याच भाषेतून त्यांना उत्तर देण्यासाठी भारत देश सज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात कठोर निर्णय घेतले आहेत, असे खासदार डाॅ. शिंदे यांनी सांगितले. काश्मीरमधील ३७० कलम हटविल्यानंतर तेथे सुस्थिरपणा येत होता. शिक्षण, नोकऱ्या, व्यवसाय वाढ सुरू झाली होती. हे प्रकार काही विघातक शक्तींना पाहवत नव्हते. या स्वस्थतेत अराजकपणा येण्यासाठी हल्ल्यासारखा प्रकार करण्यात आला आहे. पण हल्लेखोरांना प्रत्युत्तर देण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत. त्या विघातक शक्तींची कठोर शिक्षा त्यांना मिळणारच आहे, असे डाॅ. शिंदे यांनी सांगितले.यावेळी आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डाॅ. बालाजी किणीकर, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.