ठाणे : ठाणे शहर सध्या दहीहंडी उत्सवाच्या रंगात रंगले आहे. ‘गोविंदा रे गोपाळा’ च्या गजरात थरांचे थरार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर या उत्सवात गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे जिल्हा आरोग्य यंत्रणा (Health Department) सज्ज झाले आहे.

ठाणे शहरात टेंभी नाका, तलावपाळी, रघुनाथ नगर, वर्तकनगर, हिरानंदानी मेडॉस, नौपाडा आणि रेमंड याठिकाणी मोठ्या दहीहंडी असतात. या दहीहंडी फोडण्यासाठी ठाणे शहरासह मुंबई तसेच उपनगरातील गोविंदा पथक येतात. उंच उंच थर रचण्याचा मानस या गोविंदांचा असतो. हे थर एकमेकांना आधार देत रचला जात असला तरी काही गोविंदा टोल जाऊन खाली पडतात. या जखमी गोविंदांना तात्काळ उपचार मिळणे गरजेचे असते अशा वेळी आयोजकांकडून प्राथिमक उपचार दिले जातात. परंतू, पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागते. रुग्णालयात देखील त्यांना वेळेत उपचार मिळावे यासाठी ठाणे जिल्हा आरोग्य विभाग सतर्क झाले आहे.

यंदा ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात (Civil Hospital) जखमी गोविंदांसाठी २० खाटांचा विशेष कक्ष उभारण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षात सर्व आवश्यक सुविधा, औषधे आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. कोणताही गोविंदा अपघातग्रस्त झाल्यास तातडीने उपचार मिळावेत, हा यामागचा मुख्य हेतू आहे, असे जिल्हा रुग्णालयच्या वतीने सांगण्यात आले आहे.

दहीहंडी हा केवळ शक्ती, कौशल्य आणि मैत्रीचा सण नाही, तर काळजी, जिव्हाळा आणि सुरक्षिततेची भावना जपण्याचे प्रतीक आहे. या उत्सवात प्रत्येक गोविंदाची सुरक्षा तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे दही हंडीचे मनोरा लावताना कोणी गोविंदा जखमी झालाच तर, त्याच्यासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात विशेष कक्ष तैनात आहे.- डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे)

शहरातील प्रमुख दहीहंडी ठिकाणी रुग्णवाहिका सतत सज्ज राहतील, तसेच तातडीच्या सेवेसाठी प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी घटनास्थळीच उपचार देण्यासाठी उपलब्ध असतात. या यंत्रणेच्या तयारीमुळे अपघातानंतरचा वेळ वाया न घालवता जीव वाचवणे शक्य होते.- दीपक सावंत (सामाजिक कार्यकर्त्ये ठाणे)