तबेल्याचे पाडकाम पूर्ण; यशस्वी मध्यस्थीमुळे मालकाचे सहकार्य; उर्वरित रस्त्याचे काम सुरू
कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी रस्त्यात अडथळा ठरलेल्या एका तबेल्याचे बांधकाम तोडण्याचे काम पालिकेने बुधवारी पूर्ण केले. तबेली मालकाने पाडकामासाठी सहकार्य केले.
गेल्या आठवडय़ापासून गोविंदवाडी रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या तबेल्याच्या अवतीभवतीची पक्की, कच्ची अशी सुमारे वीस अनधिकृत बांधकामे पालिकेने जमीनदोस्त केली. परंतु, तबेल्याचा विषय न्यायप्रविष्ट असल्याने, पालिकेला तबेल्यावर थेट कारवाई करण्यात अडथळा येत होता. गेल्या पाच वर्षांपासून एक तबेला प्रशासन हटवू शकले नव्हते. यामुळे आयुक्त ई. रवींद्रन यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तबेला मालकासोबत समाधानकारक तोडगा काढला. यानंतर तबेला पाडण्यात आला.
गोविंदवाडी बाह्य़वळण रस्ता झाला तर शिवाजी चौक ते दुर्गाडी चौकदरम्यान कल्याणमध्ये जी वाहतुकीची कोंडी होते; ती सुटण्यास मोठय़ा प्रमाणात मदत होईल, हे पालिकेतर्फे न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आले. न्यायालयाने तबेला मालकाचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय तबेल्यावर कारवाई करूनये, अशी अट घातल्याने पालिकेची कोंडी झाली होती. पालिकेने यापूर्वी तबेला मालकाला पर्यायी जागा, त्या बदल्यात हस्तांतरणीय विकास हक्क (टी. डी. आर.) देण्याची तयारी दाखविली होती. त्यास तबेला मालक तयार नव्हता. आयुक्त रवींद्रन यांनी तबेला मालकाला नोटीस देऊन, जागा रिक्त करण्याबाबत व आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते. अखेर कल्याणमधील एका जागरूक नागरिकाने तबेला मालकाशी चर्चा केली. पालिका अभियंते या चर्चेत सहभागी झाले.
तबेला मालकाने पर्यायी जागेच्या मागणीबरोबरच, तबेला पालिकेने बांधून देण्याची मागणी केली. तसेच तबेल्याचे पाडकाम पूर्ण होईपर्यंत म्हशी ठेवण्यासाठी तात्पुरता निवारा उभारून द्यावा, अशी मागणी केली होती. या मागण्या पालिकेने मान्य केल्यानंतर तबेला मालकाने स्वत:हून तबेला सोडण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पालिकेची पथके तबेला तोडण्याच काम करीत होती.
गेल्या आठवडय़ापासून तबेल्याभोवतीची अनधिकृत बांधकामे तोडल्याच्या जागेवर पालिकेने रस्तेकाम सुरू केले आहे. तबेला तोडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर, तातडीने गोविंदवाडी रस्त्याचा रखडलेला सुमारे २०० मीटरचा पट्टा पूर्ण करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
उर्वरित रस्त्यांचाही मार्ग निधरेक?
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्तांची बदली वगैरे करण्यात येणार नाही, असे सांगून आयुक्तांना रस्तारुंदीकरण कार्यक्रमासाठी मुबलक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे उर्वरित १७ रस्त्यांच्या रुंदीकरणाचा कार्यक्रम निर्धोकपणे पार पडेल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
तबेल्याला भरपाई, व्यापाऱ्यांना काय?
तबेला मालकाला पालिकेने दामदुप्पट नुकसान भरपाई दिली. तशी भरपाई पालिकेने रस्ता रुंदीकरणाने बाधित होणाऱ्या रहिवाशांना द्यावी, अशी मागणी आता जोर धरूलागली आहे. एकाला एक न्याय आणि दुसरा वाऱ्यावर ही भूमिका प्रशासनाने कायम ठेवली, तर पालिकेच्या रस्ता रुंदीकरण कार्यक्रमात न्यायालयीन, कायदेशीर अडथळे येतील, अशी माहिती एका जाणकाराने दिली.