लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: रस्ते कामांसाठी निधीची अर्थसंकल्पीय तरतूद नसताना, दायित्व नोंद नसताना त्या कामाच्या नस्ती बांधकाम विभागातील अभियंत्यांनी तयार केल्या. हा प्रकार आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या निदर्शनास आला. त्यांनी याप्रकरणी विचारणा करताच त्या नस्ती गहाळ करण्यात आल्या. हे नस्ती गहाळ प्रकरण आता थंडावले असून यामधील निलंबित कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावरुन घेऊन उर्वरित १५ सहभागी अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी प्रशासनाने सुरू केली आहे.
‘लोकसत्ता’ने हे रस्ते बांधकामांचे नस्ती गहाळ प्रकरण उघडकीला आणले होते. या प्रकरणामुळे पालिकेत दोन महिन्यापूर्वी खळबळ उडाली होती. फडके मैदान, म्हसोबा मैदान भागातील रस्ते, मलनिस्सारणाची कामे करण्यासाठी बांधकाम विभागातील अभियंत्यांनी राजकीय दबावातून पाच नस्ती तयार केल्या. या नस्ती अंतीम मंजुरीसाठी आयुक्त डॉ. दांगडे यांच्याकडे पाठविण्यात आल्या. या नस्तींसाठी अर्थसंकल्पीय तरतूद आहे का. या नस्तींवर दायित्व नोंद का केली नाही, असे प्रश्न करुन आयुक्तांनी अशाप्रकारे नियमबाह्य नस्ती करणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिले.
आणखी वाचा- दिव्यात बेकायदा बांधकामे सुरूच, फेरीवाल्यांकडून हफ्ते वसुली होत असल्याचाही आरोप
सामान्य प्रशासन विभागात आयुक्त कार्यालयातून नस्ती आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा काढण्याची कार्यवाही तात्काळ होणे आवश्यक होते. अनेक दिवस उलटूनही या नोटिसा काढण्यात आल्या नाही. या नस्ती आणि कारणे दाखवा नोटिसा संबंधितांना दिल्या का, याची विचारणा आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांना केल्यावर त्यांनी अशाप्रकारच्या नस्ती विभागात आल्या नसल्याचे सांगितले. तपास केल्यानंतर अधीक्षक दिलीपकुमार वरकडे यांनी या नस्ती आपण आवक जावक क्रमांक न टाकता साहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे यांच्याकडे दिल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर दालनातून नस्ती गहाळ असल्याचे उघड झाले.
या प्रकरणी उपायु्क्त दिवे यांनी आयुक्तांच्या आदेशावरुन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची तयारी केली. कार्यालयातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यात लेखा अभियांत्रिकी विभागाचा शिपाई लक्ष्मण दिवेकर संबंधित ठेकेदाराकडे नस्ती देत असल्याचे दिसले. त्यावेळी तेथे लिपीक रवींद्र निमगावकर उपस्थित होते. प्रकरण उघडकीला येताच ठेकेदाराकडून नस्ती परत घेण्यात आल्या. त्या इतरत्र ठेवल्याचे चित्र उभे करण्यात आले. वस्तुस्थिती प्रशासनापासून दडवून ठेवली म्हणून दिवेकर, निमगावकर यांना निलंबित करण्यात आले. १५ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या.
आणखी वाचा-डोंबिवलीत तरुणीला फसविणाऱ्या नवरदेवाविरुध्द गुन्हा दाखल
या प्रकरणातील मुख्य जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याने महापालिका म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष बाळ हरदास यांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे, निलंबित कामगारांना परत घेण्याची मागणी आयुक्तांकडे केली. गहाळ नस्ती पुन्हा सापडल्याने, या प्रकरणातील मुख्य सुत्रधारांनी प्रशासनाकडे दया याचना केल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रशासनाने हे प्रकरण ‘शांत’ घेतले असल्याची चर्चा आहे. या प्रकरणात शासन सेवेतील दोन अधिकारी चांगलेच अडचणीत आले होते. त्यांना प्रशासनाने अभय दिल्याने इतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती.
“ गहाळ नस्ती सापडल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशी सुरू केल्या आहेत. त्यामुळे हे प्रकरण थांबलेले नाही.” -डॉ. भाऊसाहेब दांगडे, आयुक्त.