शहरातील पश्चिमेला असलेली भाजी मंडई आणि त्यातील भाजीही नावापुरती उरली आहे. त्यामुळे भाजीविक्रेत्यांनी मंडईतील जागा सोडून पूर्वीसारखी रस्त्यावर बसून भाजी विकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र झाली आहे.
तत्कालीन प्रशासकीय अधिकारी आर. डी. शिंदे यांच्या धडक कृतीमुळे पश्चिमेला शिवछत्रपती शिवाजी भाजी मार्केट वसवण्यात आले. या मंडईत सध्या हाताच्या बोटावर मोजता येईल, ऐवढेच गाळे सुरू आहेत. यातील बहुतेक मंडळी पुन्हा रस्त्यावर किंवा मंडईच्या बाहेरच विक्री करीत आहेत. त्यामुळे हे मार्केट आहे की अडगळ असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
शहराची म्हणून जी बाजारपेठ आहे ती पूर्वीपासून पश्चिमेलाच आहे. यात प्रामुख्याने किराणा मालाचे व्यापारी, कपडय़ाचे व्यापारी, स्टेशनरी आदींची दुकाने आहेत. आसपासच्या खेडय़ांतील शेतकरी ताजी भाजी घेऊन बाजारपेठेत जिथे जागा मिळेल, तिथे बसून आपला व्यवसाय करीत होते. तसेच काही जण दारोदार टोपलीतून भाजी विकत होते. कालांतराने भाजी विक्रेत्यांनी रस्त्याच्या दुतर्फा आणि पदपथावर आपला कब्जा केला. आधीच अरुंद रस्ता त्यात दोन्ही बाजूने फेरीवाले आणि भाजी विक्रेत्यांचा मुख्य रस्त्याला पडलेल्या विळख्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली.
१९९५ मध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून आलेल्या आर. डी. शिंदे यांनी बाजारपेठेलगत भाजी विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली. कुळगाव-बदलापूर शहर व्यापारी संघटना पुरस्कृत शिवछत्रपती शिवाजी भाजी मार्केट असे त्याचे नामकरण करण्यात आले. सुमारे ३० ते ४० पत्र्याचे गाळे येथे बांधण्यात आले. यात प्रामुख्याने पथपदावर ठाण मांडून बसलेल्यांना जागा देण्यात आली.
मार्केट असून अडचण
बाजारपेठेतील पदपथ मोकळा करण्यासाठी आणि मुख्य रस्त्यावरील नित्याची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भाजी विक्रेत्यांना येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. पंरतु या ठिकाणी व्यवसाय होत नाही, अशी ओरड येथील काही विक्रेत्यांनी सुरू केली. तसेच ठरावीक लोकांनाच येथे जागा मिळाली अशीही तक्रार करण्यात येत होती. परिणामी काही विक्रेत्यांनी पुन्हा आपले बस्तान रस्त्याच्या दुतर्फा मांडले. नागरिकांना त्यांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर भाजी उपलब्ध झाली तर मुद्दाम मार्केटमध्ये कोण येणार असा ठाम विश्वास विक्रेत्यांचा झाल्याने त्यांनी कोणालाही न जुमानता मार्केटमधले गाळे बंद केले आहेत. त्यामुळे गाळ्यांना भंगारावस्था आली आहे.
बंद गाळ्यांमुळे अवकळा
सध्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच गाळे या ठिकाणी सुरू आहेत. त्यात भाजीचे दोन ते तीन गाळे आहेत, बाकी इतर गाळे अन्य व्यावसायिकांचे आहेत. समोरचे गाळे सोडले तर मागचे गाळे बंद आहेत. यामुळे बकालपणा आला असून भंगार बाजरासारखी अवकळा आली आहे. पदपथावरील बहुतेक गाळे हे राजकीय मंडळींशी संबंधित होते, अशी चर्चा होती. परंतु मार्केटमध्ये आल्यानंतर त्यांना योग्य मोबदला मिळत नसल्याने बहुतेक या मंडळींचे गाळे बंद असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
समीर पारखी, बदलापूर
संग्रहित लेख, दिनांक 11th Feb 2015 रोजी प्रकाशित
बदलापुरात बोलाचीच मंडई, बोलाचीच भाजी
शहरातील पश्चिमेला असलेली भाजी मंडई आणि त्यातील भाजीही नावापुरती उरली आहे. त्यामुळे भाजीविक्रेत्यांनी मंडईतील जागा सोडून पूर्वीसारखी रस्त्यावर बसून भाजी विकण्यास सुरुवात केली आहे.
First published on: 11-02-2015 at 12:18 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hawkers on road create severe traffic congestion problem