९०.९६ टक्के पोलिसांना कोणतीही वैद्यकीय पार्श्वभूमी नाही;
कर्तव्यावर हजर असताना करोनाची लागण झालेल्यांचे प्रमाण ९१ टक्के
जयेश सामंत-आशीष धनगर, लोकसत्ता
ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयातील कार्यरत असणाऱ्या ठणठणीत पोलिसांनाच सर्वाधिक करोनाची लागण झाली असल्याची माहिती नुकतीच एका अहवालातून समोर आली आहे. लागण झालेल्या ७५३ पोलिसांपैकी ६८५ जणांना कोणतीही वैद्यकीय पार्श्वभूमी नसून हे प्रमाण एकूण लागण झालेल्या पोलिसांच्या ९०.९६ टक्के आहे. तर, पोलीस दलातील करोनाबाधित झालेल्यापैंकी ९१.६७ टक्के पोलिसांना कर्तव्यावर हजर असताना करोनाची लागण झाली असून यातील सर्वाधिक पोलीस २० ते ४० वयोगटातील आहे.
करोनाचा प्रसार वेगाने वाढू लागल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या ठाणे पोलीस दलातही करोनाचा शिरकाव झाला असून ठाणे पोलीस आयुक्तालयातील ७५३ पोलिसांना आत्तापर्यंत करोनाची लागण झाली आहे. करोनाच्या या प्रकरणाचा एक अहवाल ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेतर्फे तयार करण्यात आला असून या अहवालातून आश्चर्यकारक माहिती समोर आली. लागण झालेल्या ७५३ पोलिसांपैकी ६८५ जणांना रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार अशा कोणत्याही आजाराची वैद्यकीय पार्श्वभूमी नाही. त्यामुळे हे कर्मचारी ठणठणीत असतानाही त्यांना करोनाची लागण झाली असून हे प्रमाण एकूण बाधित पोलिसांच्या ९०.९६ टक्के आहे. तर, या ७५३ पोलिसांपैकी ६९० जणांना कर्तव्य बजावत असताना करोनाची लागण झाली आहे.
ठाणे पोलीस दलातील सर्वाधिक संसर्ग हा पोलीस मुख्यालयात पसरला असून ७५३ पोलिसांपैकी ११८ बाधित पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. तर, यातील सर्वाधिक कमी लागण ही विशेष शाखेतील पोलिसांना झाली असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे. ७५३ पोलिसांतर्फे ६३१ कर्मचारी करोनामुक्त झाले असून १११ जणांची प्रकृती स्थिर असून ते उपचार घेत आहेत. तर, ६ पोलीस कर्मचारी अतिदक्षता विभागात दाखल असून ५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर लागण झालेल्या ७५३ पोलिसांपैकी ५०३ पोलीस हे २० ते ४० वयोगटातील आहेत.
विभागानुसार बाधित पोलीस
विभाग बाधित पोलीस
मुख्यालय ११८
परिमंडळ १ ठाणे ९०
परिमंडळ २ भिवंडी ९२
परिमंडळ ३ कल्याण ८९
परिमंडळ ४ उल्हासनगर ६७
परिमंडळ ५ वागळे ८९
मोटार परिवहन १७
गुन्हे शाखा २४
शहर वाहतूक शाखा ३२
जलद प्रतिसाद पथक १२
राज्य राखीव पोलिस बल ९१
नियंत्रण कक्ष १९
विशेष शाखा ५
मंत्रालयीन कर्मचारी ८
वैद्यकीय पार्श्वभूमीतील करोना प्रकरणे
आजार पोलिसांची संख्या
कोणतीही वैद्यकीय
पार्श्वभूमी नसलेले ६८५
रक्तदाब १९
मधुमेह १९
रक्तदाब, मधुमेह १५
हृदयविकार १२
मूळव्याध २
यकृत विकार १
करोनाची लागण झालेले स्रोत
स्रोत पोलिसांची संख्या
पोलीस ठाणे कर्तव्य ५०९
सहकाऱ्यांमार्फत १०६
नागरिकांच्या संपर्कातून ४०
आरोपीच्या संपर्कातून ७
प्रवासदरम्यान १८
नक्की सांगता येत नाही ५२
कर्तव्यावर नसताना
अन्य मार्गाने ११
ठाणे पोलीस दलातील करोनाबाधित झालेल्या कर्मचाऱ्यांचे सविस्तर विश्लेषण केले असून कोणत्या परिस्थितीत पोलिसांना ही लागण झाली याची विस्तृत माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे येत्या काळात कशा प्रकारे काळजी घ्यावी, हे ठरवणे सोपे जाणार आहे.
– विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर