ठाणे : ठाणे, कल्याण, बदलापूर जिल्ह्यात गेल्याकाही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारी रिमझिम कोसळत नागरिकांची दैना उडविली. ठाण्यात पाऊस पडल्याने काही भागात चिखल झाला होता. शहरात पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे. भिवंडीत मुख्य आणि अंतर्गत मार्गावर खड्डे पडल्याने वाहतुक कोंडी झाली होती. कल्याण आणि बदलापूरमध्येही नागरिकांचे पावसामुळे हाल झाले.
गेल्याकाही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. ठाण्यात बुधवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. ठाण्यात बुधवारी दुपारी २.३० वाजेपर्यंत ३३.२७ मीमी पावसाची नोंद झाली होती. पावसामुळे वाहतुक संथ होऊन माजिवडा, कापूरबावडी परिसरात वाहतुक कोंडी झाली होती. मागील दोन ते तीन दिवसांत पुरेसा पाऊस पडत नसल्याने प्राधिकरणांनी खड्डे बुजविण्यास सुरुवात केली होती. परंतु ज्या ठिकाणी तात्पुरते खड्डे बुजविण्यात आले होते. तेथील अनेक ठिकाणी पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले होते. त्यामुळे वाहन चालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक भागात चिखल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांचे, शाळकरी विद्यार्थ्यांचे पावसामुळे हाल झाले.
भिवंडी शहरात गोदामे आहेत. या गोदामांत दुपारी आणि रात्रीच्या वेळेत अवजड वाहनांची वाहतुक होते. येथील अनेक भागात मुख्य आणि अंतर्गत मार्गांवर खड्ड्यांमुळे वाहतुक कोंडी होते. पावसामुळे येथील वाहतुक मंदावली होती. त्यामुळे काल्हेर-कशेळी-भिवंडी मार्गावर अंजुरफाटा ते काल्हेरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर मुंबई नाशिक महामार्गावर खारेगाव मानकोली भागात वाहतुक कोंडी झाली होती. भिवंडी शहरातील अंतर्गत मार्गावरही खड्डे पडले होते. त्यामुळे या भागातून प्रवास करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.
कल्याण, डोंबिवली परिसरात दोन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत होत्या. पाऊस पडल्यानंतर सखल भागात पाणी साचत होते. मागील काही दिवसांपासून पाऊस नव्हता. परंतु आता पाऊस पडत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पावसामुळे अनेक पर्यावरणप्रेमी नागरिकांनी कल्याण, डोंबिवली शहर परिसरात वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले आहेत.
तर, मंगळवारपासून अंबरनाथ, बदलापूर आणि आसपासच्या परिसरात रिमझीम पाऊस कोसळत होता. बुधवारीही सकाळपासून रिमझीम पाऊस बरसला. गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसाने जलस्त्रोत भरले. मात्र गेल्या आठवड्यात पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. रिमझीम पाऊस कोसळत असल्याने कुठे पाणी साचले नव्हते.