खड्डय़ांमुळे ठाण्याच्या चारही दिशांवर वाहनांच्या रांगा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : महत्त्वाच्या रस्त्यांवर पडलेले खड्डे, बेकायदा होणारी अवजड वाहतूक, नियंत्रण यंत्रणांमधील नियोजनाचा अभाव यामुळे गेल्या काही दिवसांपासून ठाणे, नवी मुंबई, शीळ-कल्याण, घोडबंदर मार्गावर सकाळ, सायंकाळ वाहतुकीची महाकोंडी सुरू आहे.

या कोंडीमुळे शेकडो वाहने तासन्तास अडकून पडत आहेत. गेल्या आठवडय़ात कोसळलेल्या मुसळधार पावसात आनंदनगर, ऐरोली, खारेगाव टोलनाक्यालगतच्या रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्याने याठिकाणी आधीच मंदावणारी वाहतूक पुरती खोळंबू लागली आहे. विशेष म्हणजे, सायंकाळच्या वेळेत पूर्व द्रुतगती महामार्गावर आनंदनगर टोलनाक्यावर अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून यामुळे ही कोंडी अधिक भयावह भासू लागली आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे एकमेकांना विविध रस्त्यांनी जोडली गेली आहेत. या शहरांचे गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने नागरीकरण होत असताना या भागांतील वाहतूक कोंडीदेखील आता हाताबाहेर जाऊ लागली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईदरम्यान गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या दुपटीने वाढली असून यामुळे सकाळ-संध्याकाळी या शहरांमधील महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. जागोजागी पडलेल्या खड्डयामुळे ही कोंडी गेल्या काही दिवसांपासून उग्र रूप धारण करू लागली आहे. आनंदनगर टोलनाका, कळवा खाडी पूल, मुंब्रा बाह्य़वळण रस्ता, शीळ-कल्याण मार्ग, खारेगाव टोलनाका, माणकोली, घोडबंदर मार्गावर दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने महामुंबईचा हा प्रवास प्रवाशांना असह्य़ ठरू लागला आहे.

अवजड वाहनांचा बेकायदा प्रवास

दुपारी १२ ते ४ या वेळेत केवळ शरही भागांत अवजड वाहतुकीला प्रवेश दिला जातो. मात्र, या वेळेव्यतिरिक्तही अवजड वाहने सर्रास प्रवास करताना दिसत आहेत. खड्डय़ांमुळे ही वाहतूकही मंदावत असल्याने या कोंडीत लहान वाहने अधिक रखडत आहेत.

२० मिनिटांचा प्रवास दोन तासांवर!

खड्डय़ांमुळे होणाऱ्या कोंडीचा सर्वात मोठा फटका संध्याकाळी मुंबईतून ठाण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. आनंदनगर टोलनाक्यापासून घोडबंदरपर्यतच्या एरवी १५ ते २० मिनिटे लागणाऱ्या प्रवासासाठी दीड ते दोन तास खर्ची पडत आहेत. कोपरी पुलाच्या कामामुळे आधीच हा रस्ता निमुळता झाल्याने त्याआधीच जुन्या ठाण्याच्या

दिशेने जाण्यासाठी चेकनाक्यावरून उजवीकडे मार्गिका सुरूकरण्यात आली आहे. पण त्यामुळे वाचणारा वेळ आता खड्डय़ांनी भरून काढला आहे! भाडुंप पंपिंग स्थानकापासूनच वाहनांच्या रांगा लागत असल्याने प्रवासी मेटाकुटीस आले आहेत.

ठाणे शहरातील महामार्ग आणि अंतर्गत मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून यामुळे अवजड वाहतूक संथगतीने सुरू असते. यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न सुरू असतात. 

– अमित काळे, पोलिस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy traffic on all four directions of thane due to potholes zws
First published on: 10-08-2019 at 04:15 IST