अंबरनाथः खोणी–तळोजा महामार्गावर दिवसा होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे लहान वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागते आहे. अनेकदा या अवजड वाहनांवर असलेल्या अवाढव्य आकाराच्या साहित्यामुळे इतर वाहनांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी सकाळी अशाच एका अवजड ट्रेलरच्या धडकेमुळे शालेय बसेस, खासगी कंपन्यांच्या बस आणि दुचाकीस्वारांचे अपघात होऊन मोठे नुकसान झाले. महामार्गावर अवजड वाहनांना सकाळी बंदी असतानाही ही वाहने या मार्गावर कशी आली, असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे.

खोणी तळोजा मार्ग हा उपनगरातून मुंबई, नवी मुंबई, तळोजा, पनवेल, खारघर अशा भागात जाण्यासाठी महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावर गेल्या काही वर्षात नागरी वस्तीही वाढली आहे. अनेक नामांकीत बांधकाम व्यावसायिक या मार्गावर आपले मोठमोठे गृहप्रकल्प उभारत आहेत. त्यामुळे येथे कार्यालयांची संख्याही वाढली आहे. याच मार्गावरून तळोजा या औद्योगिक वसाहतीकडे जाता येते. त्यामुळे यामार्गावर मोठ्या संख्येने वाहने असतात.

सोमवारी सकाळच्या सुमारास चाकरमान्यांची वर्दळ सुरू असताना तीन अवजड ट्रेलर महामार्गावरून जेएनपीटीच्या दिशेने वेगाने जात होते. या वाहनांचा आकार प्रचंड असल्याने बाजूने जाणाऱ्या वाहनांना त्यांची धडक बसत होती. यात टेम्पो, दुचाकी आणि शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसही बाधित झाल्या. काही वाहनचालकांना किरकोळ दुखापती झाल्या असून, अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तीनही ट्रेलर चालकांना ताब्यात घेतले. मात्र अपघातानंतर एका चालकाने वाहन सोडून पलायन केल्याने महामार्गावर चिरड गावापासून खोणी फाट्यापर्यंत लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे कामगारवर्ग आठवड्याच्या पहिल्याच दिवशी उशिरा इच्छित स्थळी पोहोचला.

या प्रकरणानंतर संतप्त नागरिकांनी वाहतूक पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे. सकाळच्या सुमारास वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अवजड वाहनांना बंदी घातली जाते. मात्र अनेकदा या अवजड वाहनांकडे डोळेझाक केली जाते. त्यामुळे ही वाहने रस्त्यावर येऊन वाहतूक कोंडी करतात. त्याचा फटका शाळेत जाणारे विद्यार्थी, कामावर जाणारे नोकरदार यांना बसतो. त्यामुळे वाहनचालकांत संतापाचे वातावरण आहे. यावर कायमचा उपाय शोधण्याची मागणी होते आहे.

कारवाईवर प्रश्नचिन्ह

मानपाडा पोलिसांनी तिन्ही ट्रेलर चालकांवर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र, एवढ्या गंभीर घटनेनंतरही अवजड वाहनांच्या वाहतुकीवर ठोस नियंत्रण येणार का हा प्रश्न अनुत्तरित आहे.