ठाणे : Thane Traffic News: ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या शहरांमध्ये अवजड वाहनांना रात्री ११ ते पहाटे ५ आणि दुपारी १२ ते सायंकाळी ४ यावेळेत वाहतूक करण्यास परवानगी आहे. असे असतानाही अवजड वाहनांचा रात्री वाढलेला भार, खड्डे, अरुंद रस्ते यामुळे घोडबंदर, मुंबई-नाशिक महामार्ग, शीळफाटा येथे मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
तसेच अनेक ठिकाणी वाहने देखील बंद पडली आहेत. त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला असून दुपारी १२ नंतरही ही वाहतूक कोंडी कायम आहे. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या नोकरदार वर्गाला वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आले नाही. अनेक वाहने चार ते पाच तास कोंडीत अडकून आहेत.ठाणे जिल्ह्याला मागील काही दिवसांपासून कोंडीने ग्रासले आहे. रस्त्यांची दुरावस्था, खड्डे, एकाच वेळी सुरु असलेले प्रकल्प, पोलिसांचे ढिसाळ वाहतुक नियोजन यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
त्यात, आज सकाळपासूनही घोडबंदर, मुंबई-नाशिक महामार्ग, शीळफाटा याठिकाणी मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे. पहाटे ५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ठाणे जिल्ह्यात अवजड वाहनांना वाहतूक करण्यास बंदी असली तरी पहाटे ५ नंतरही अवजड वाहनांची वाहतूक सुरु असल्याचे दिसत आहे. या वाहतूकीचा फटका खासगी तसेच सार्वजनिक वाहनांना बसत आहे. अवजड वाहनांचा भार, रस्त्यावरील खड्डे, अरुंद रस्ते आणि त्यात आज सकाळी कोनगाव येथे कल्याण-डोंबिवली परिवहन विभागाची बस बंद पडल्यामुळे वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. कल्याण-डोंबिवलीहून ठाणे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या नोकरदार वर्गाचे या कोंडीत हाल झाले आहेत.
तर, रबाळे मार्गावर देखील ऐन सकाळी कंटेनर बंद पडल्यामुळे संपूर्ण शीळफाटा रोड कोंडीत अडकला आहे. कल्याण शीळफाटा रस्ता, दिवा शीळ रस्त्यावर या कोंडीचा फटका बसला आहे. या वाहतूक कोंडीचा परिणाम भिवंडीतील अंतर्गत मार्गावर तसेच घोडबंदर मार्गावर देखील झाला आहे. याठिकाणी देखील काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
४० ते ४५ मिनीटाच्या अंतरासाठी दीड ते दोन तास
मी दररोज कल्याण ते ठाणे दुचाकीने प्रवास करतो. दररोज मला ठाण्यात पोहोचायला ४० ते ४५ मिनीट लागतात. परंतू, आज मी दोन तास वाहतूक कोंडीतच अडकून होतो. अवजड वाहनांमुळे या कोंडीत आणखी वाढ झाली आहे, अशी प्रतिक्रिया एका नागरिकाने दिली.