ठाणे : गणेश आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी ठाणे शहरात अवजड वाहनांना बंदी घालावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पोलिस प्रशासन आणि वाहतूक विभागाला दिले असले तरी, या आदेशानंतरही रविवारी पाच दिवसांच्या गणपत्ती विसर्जनावेळी शहरात अवजड वाहतूक सुरूच असल्याचे चित्र दिसून आले. त्यातच दिवसभरात चार ते पाच वाहने गायमुख घाट परिसरात बंद पडल्याने घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने नागरिक हैराण झाले होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी अवजड बंदीचे आदेश काढले असले तरी पालघर आणि रायगड जिल्हा पोलिसांसोबतच्या समन्वयाच्या अभावामुळे येथून शहरात अवजड वाहतूक सुरूच असल्याने ही कोंडी झाली असून यामुळे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचा अवजड वाहतूक बंदीचा आदेश नावापुरताच असल्याचे दिसून आले.
ठाणे शहरातून मुंबई-नाशिक आणि घोडबंदर (ghodbundar) असे महामार्ग जातात. हे मार्ग मुंबई, पालघर, नवी मुंबई, मिरा-भाईंदर आणि गुजरात राज्यातील वाहतूकीसाठी महत्वाचे मानले जातात. या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. याशिवाय, या मार्गावरून शहरातील वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते.
असे असतानाच, या दोन्ही मार्गांवर मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. तर, घोडबंदर मार्गावर मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी कामही सुरू आहे. यामुळे या मार्गावरील रस्ते अरुंद झाल्याने वाहतूक कोंडी होत आहे. पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडल्याने कोंडीत भर पडत आहे. अवजड वाहनांना ठाणे शहरातून वाहतूक करण्यासाठी रात्री ११ ते पहाटे ५ आणि दुपारी १२ ते ४ यावेळेत परवानगी असली तरी या वेळे व्यतिरीक्तही शहरात अवजड वाहनांची वाहतूक सुरूच असते. यामुळे वाहतूक कोंडी होत असून या कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात ठाणे शहरातील वाहतूक सुरळीत रहावी यासाठी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी एक बैठक घेऊन महत्वाचे आदेश दिले होते. गणेश आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी ठाणे शहरात अवजड वाहनांना बंदी घालावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डाॅ. पांचाळ यांनी पोलिस प्रशासन आणि वाहतूक विभागाला दिले होते.
यानंतरही रविवारी पाच दिवसांच्या गणपत्ती विसर्जनावेळी शहरात अवजड वाहतूक सुरूच असल्याचे चित्र दिसून आले. त्यातच दिवसभरात चार ते पाच वाहने गायमुख घाट परिसरात बंद पडल्याने घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी होऊन त्यात नागरिक अडकले होते. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
कोंडी सोडविताना पोलिसांची दमछाक
ठाणे शहरात दिड, सात आणि दहा दिवसांच्या गणपत्ती विसर्जनाची संख्या जास्त असते. त्या तुलनेत पाच दिवसांच्या गणपत्ती विसर्जनाची संख्या कमी असते. यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर मिरवणुकांचे प्रमाणही कमी असते. त्यातच रविवार सायंकाळपासून पाऊस सुरू असल्याने मिरवणुकांची संख्येत घट झाली होती. असे असतानाही रविवारी गणपत्ती विसर्जनाच्या दिवशी वाहतूक कोंडी झाली होती.
या मार्गावर तीन ते चार ट्रक दिवसभरात बंद पडल्याने कोंडी झाली. त्यात पालघरहून येणारी अवजड वाहने घोडबंदरवरील गायमुख परिसरात पोलिसांना रोखून धरावी लागली. यामुळे कोंडीत भर पडून त्याचा फटका शहरातील अंतर्गत मार्गांना बसला. ही कोंडी सोडविताना पोलिसांची दमछाक झाली.
सोमवारी सकाळीही शहरात अवजड वाहतूक अवेळी सुरूच होती. यातील एक वाहन कापुरबावडी उड्डाण पुलावर बंद पडले. त्यातील साहित्य दुसऱ्या वाहनामध्ये भरण्यात येत होते. यामुळे या मार्गावर काहीकाळ कोंडी झाल्याचे दिसून आले. तसेत कशेळी-काल्हेर मार्गावरही वाहतूक कोंडी झाली होती.
कोट पालघर आणि रायगड जिल्ह्यातून अवजड वाहने रविवारी गणपत्ती विसर्जनाच्या दिवशी ठाणे शहराच्या दिशेने सोडण्यात आली होती. ही वाहने शहरात आल्यानंतर त्यांना रोखून धरली तर, वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होऊ शकते. यामुळे या वाहनांची शहरातून वाहतूक सुरू होती. त्यातच गायमुख भागात दिवसभरात तीन ते चार अवजड वाहने बंद पडल्याने कोंडी झाली, अशी माहिती ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.