ठाणे : ठाण्यातील विकास प्रकल्पांमध्ये परवानगी देताना वृक्षांची बेसुमार कत्तल होत असल्याचा मुद्दा सातत्याने चर्चेत असतानाच, काही ठराविक बिल्डराच्या प्रकल्पांची वाट मोकळी करून देण्यासाठी वारसा (हेरीटेज) वृक्षांचे वयोमान कमी दाखविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ठाणे येथील पोखरण रोड क्रमांक २ भागातील एका मोठ्या बिल्डरच्या गृहप्रकल्पाला परवानगी देताना शंभर वर्षांपेक्षा जास्त जुन्या वृक्षांचे वयोमान कमी दाखवून त्यावर कुऱ्हाड चालविण्यात आल्याचे प्रकरण पुढे आल्याने पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी वन विभागाने केलेल्या पाहाणीत वृक्षाचे वयोमान लपविण्यात आल्याचे समोर आले असून तसा अभिप्राय या विभागाने पालिकेला दिला होता. त्यानंतरही या वृक्षांना तोडण्यास परवानगी देण्यात आल्याने पर्यावरण प्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. यामुळे वृक्ष प्राधिकरण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे.
या संदर्भात ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाचे उपायुक्त मधुकर बोडके यांच्याशी संपर्क साधला असता, माझ्या गेल्या सहा महिन्याच्या काळात कोणत्याही परवानग्या देण्यात आलेल्या नसून हे प्रकरण जुने असल्याने त्याबाबत मला सांगता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
चौकटठाणे महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समितीत तज्ज्ञ सदस्यांची नेमणुक करण्यात आली होती. हे सदस्य प्राधिकरणाकडे दाखल होणाऱ्या प्रस्तावातील वृक्षांची पाहाणी करून त्यानंतर वृक्ष तोडीस किंवा पुनर्रोपण करण्यास परवानगी दिली जात होती. मात्र, या समितीची मुदत २०२२ संपुष्टात आली. यानंतर वृक्ष तोडीच्या प्रस्तावांना मान्यता देण्यासाठी पालिकेने वनविभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत स्थळ पाहाणी सुरू केली होती. परंतु काही महिन्यानंतर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने आपल्याच विभागामार्फत पाहाणी करून परवानगी देण्यास सुरूवात केली.
ठाणे येथील पोखरण रस्ता क्रमांक २ परिसरात मे. ऑबेराय रिआल्टी या कंपनीमार्फत गृह प्रकल्प उभारण्यात येत आहे. या कंपनीने प्रकल्पात अडसर ठरत असलेली २२३ वृक्ष तोडण्याचा तर, ३६१ वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव पालिकेकडे दाखल केला होता. पालिकेने वनविभागाकडून बाधित वृक्षांची पाहाणी केली होती आणि त्याचा अहवालही वनविभागाने पालिकेला दिला होता. यामध्ये प्रत्यक्ष वृक्षांची पाहणी आणि त्यांच्या वयाची तपसणी केली असता, मे. ऑबेराय रिआल्टी यांनी वृक्षांचे वयोमान प्रत्यक्ष वयोमानापेक्षा कमी दाखविलेले आहे. तसेच सदर जागेत वृक्ष क्रमांक ७३ मोहा या वृक्षाचे वय हे शंभर वर्षापेक्षा जास्त आहे आणि इतर वृक्षांची तपासणी केली असता, प्रत्यक्षात असणाऱ्या वृक्षांचे वय आणि त्यांनी दर्शविलेले वृक्षांचे वय यामध्ये मोठी तफावत आढळुन येत आहे, असा ठपका वनविभागाने ठेवला होता. या संदर्भात मे. ऑबेराय रिआल्टीचे प्रतिनिधी राजेंद्र चांदोरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
प्रकरण कसे उघडकीस आले
मे. ऑबेराय रिआल्टी या कंपनी आता पुन्हा फेज १, २ आणि ३ करीता ४८४ वृक्ष तोडण्याचा तर २४२ वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव पालिकेकडे सादर केला असून त्यावर पालिकेने हरकती आणि सुचना मागविल्या आहेत. त्यावर माजी वृक्ष प्राधिकरण सदस्य विक्रांत तावडे यांनी हरकत घेतली असून त्यात २०२३ रोजी वनविभागाने दिलेला अभिप्राय जोडला आहे. यानंतर वृक्षांचे वयोमान कमी दाखविण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी तावडे यांनी केली आहे.
राज्याची परवानगी नको म्हणूनच ५० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयोमान असलेली वृक्षांची गणना वासरा वृक्षात केली जाते. या झाडांचे वय शास्त्रीय पद्धतीने निश्चित केले जाते. यामध्ये दुर्मिळ प्रजाती, विशेष आकारमान किंवा परिसंस्थेतील महत्त्व यासारखी इतर निकषही विचारात घेतले जातात. महाराष्ट्र (शहरी भाग) झाडांचे संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५ आणि त्यामध्ये २०२१ मध्ये झालेल्या सुधारणेनुसार, वारसा झाडे तोडणे किंवा नुकसान करणे यास बंदी आहे. केवळ काही विशिष्ट परिस्थितींमध्येच परवानगी दिली जाऊ शकते. ती सुद्धा राज्य शासनाकडून परवानगी घ्यावी लागते. राज्य शासनाकडे परवानगीसाठी जावे लागू नये म्हणूनच वृक्षांचे वयोमान लपविले जाते, असा दावा विक्रांत तावडे यांनी केला.