ठाणे : शहरातील घोडबंदर परिसरात असलेल्या कावेसर तलाव गेले अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. या तलावाच्या ठिकाणी सुशोभिकरण करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला असून स्थानिक रहिवाशी आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांचा या सुशोभिकरणाला विरोध आहे. या सुशोभिकरणाच्या कामामुळे या तलावाच्या आजूबाजूला असलेल्या जैवविविधतेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ही जैवविविधता टिकून राहण्यासाठी समाजात जनजागृती करण्याची गरज आहे. त्यासाठी स्थानिक रहिवाशांनी रविवारी कावेसर तलावाजवळ ‘हेरिटेज ट्री वॉक’ चे आयोजन केले होते.

घोडबंदर परिसरातील कावेसर तलावाजवळ हेरिटेज ट्री वॉक साठी स्थानिक परिसरातील तसेच शहराच्या आसपासचे आणि पर्यावरण प्रेमी असे १०० हून अधिक नागरिक उपस्थित होते. यामध्ये तरुणांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. या हेरिटेज ट्री वॉकला शहापूर येथील शेतकरी भावंड समिर धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी यांनी मार्गदर्शन केले. कावेसर तलाव हा सुमारे १५० वर्ष जुना तलाव आहे. या तलावाच्याभोवती जैवविविधता आहे. तसेच या तलावात दुर्मिळ मानले जाणारे पांढरे कमळ आढळून येते. त्यामुळे पर्यावरणप्रेमी तसेच हिरानंदानी भागातील नागरिक या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी नेहमी जातात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिरानंदानी इस्टेट भागात बगीचे आहेत. परंतु, नैसर्गिक तलाव येथील रहिवाशांसाठी आकर्षणाचा भाग ठरतो. कावेसर तलावा जवळ विविध झाडे आहेत. तेथील प्रत्येक झाडांचे वेगळे वैशिष्ट आहे. याठिकाणी वेगवेगळे पक्षी आढळून येतात. परंतू, याठिकाणी असलेल्या या जैवविविधतेच्या बाबतीत अनेक नागरिकांना माहिती नाही. त्यांना याची माहिती मिळावी, त्यांच्या मध्ये निसर्गाविषयी जागृकता निर्माण व्हावी याकरिता हा हेरिटेज ट्री वॉक आयोजित करण्यात आला होता, अशी माहिती स्थानिक नागरिका सुरज सामंत यांनी दिली. या उपक्रमाद्वारे नागरिकांना तलावाच्या जैवविविधतेचे महत्त्व आणि झाडांची माहिती देण्यात आली.