अनंत कान्हेरे यांच्या फाशीस्थळाचे संवर्धन करण्याचा निर्णय
किशोर कोकणे
ठाणे : ठाणे शहराच्या इतिहासात मध्यवर्ती कारागृहाच्या वास्तूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वातंत्र्यसैनिक अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना याच कारागृहात फाशी देण्यात आली होती. अनेक क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य चळवळीत येथे कारावास भोगला. अशा स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या आठवणींनी भारलेल्या ठाणे कारागृहातील फाशीस्थळाचे संवर्धन करून ते पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. अनंत कान्हेरे यांच्यासह अन्य क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली, त्या ठिकाणाचे संवर्धन करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतीच निविदा काढली आहे.
ठाणे कारागृह हा मुळात एक किल्ला होता. १७३० मध्ये पोर्तुगिजांनी हा किल्ला बांधण्यास सुरुवात केली होती. १७३७ मध्ये मराठा सैन्यांनी हा किल्ला जिंकला. त्यानंतर १७७४ मध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला मराठय़ांकडून जिंकून घेतला. ब्रिटिशांनी या किल्ल्यात बंदिवान ठेवण्यास सुरुवात केली. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनाही याच तुरुंगात ठेवण्यात आले होते. जॅक्सन या अधिकाऱ्याचा वध केल्याप्रकरणी ब्रिटिशांनी अनंत कान्हेरे, अण्णा कर्वे आणि विनायक देशपांडे यांना पकडून ठाणे कारागृहात ठेवले. १९१० मध्ये या तिघांनाही याच कारागृहात फाशी देण्यात आली होती. अनेक थोर क्रांतिकारकांच्या स्मृतींच्या खुणा जपणाऱ्या ठाणे कारागृहातील हा वारसा पर्यटकांसमोर उलगडावा, यासाठी आमदार संजय केळकर यांच्याकडून गेल्या चार ते पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. तसेच इतिहास संशोधकांचीही या ठिकाणी ऐतिहासिक पर्यटनस्थळ असावे अशी मागणी होती. काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कारागृह प्रशासनाने क्रांतिवीरांना देण्यात आलेल्या फाशीच्या स्थळाची पाहणी केली. हे ऐतिहासिक स्थळ तसेच त्या परिसरातील पडिक वास्तू दुरुस्त करणे, संवर्धन करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा काढली आहे.
ठाणे कारागृहात अनेक क्रांतिवीर बंदिवान होते. काही क्रांतिवीरांना या कारागृहात फाशी देण्यात आली होती. त्यांच्या बलिदानाची माहिती भावी पिढीला असणे आवश्यक आहे. त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू होता आणि असाच सुरू राहणार आहे.
– संजय केळकर, आमदार.