विठ्ठलवाडी स्थानकात सरकत्या जिन्याची सुविधा

अंबरनाथ : अंबरनाथ रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक आणि दोनवरील प्रवाशांची गर्दी विभागण्यासाठी आवश्यक असलेला ‘होम फलाट’ बुधवारी अखेर प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते मुंबई आणि उपनगरी रेल्वे स्थानकांतील विविध सुविधांचे बुधवारी लोकार्पण करण्यात आले. यात विठ्ठलवाडी स्थानकातील सरकत्या जिन्याच्या सुविधेचाही समावेश आहे.

अंबरनाथ शहरात लोकसंख्या वाढत असून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्याही झपाटय़ाने वाढत चालली आहे. या पाश्र्वभूमीवर  अंबरनाथमधील ‘होम फलाट’ प्रवाशांसाठी खुला. स्थानकातील फलाट क्रमांक एकजवळ होम फलाट उभारण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. रेल्वे प्रशासनाने २०१७मध्ये यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतरच्या वर्षांत या कामाची निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी या फलाटाच्या उभारणीचे काम पूर्ण झाले. त्यामुळे बुधवारी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत एका रेल्वे प्रवाशाच्या हस्ते या फलाटाचे उद्घाटन करण्यात आले.  या लोकार्पण कार्यक्रमाला स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ऑनलाइन पद्धतीने हजेरी लावली. 

प्रवाशांना फायदा

अंबरनाथ स्थानकात फलाट क्रमांक  एक आणि दोन संलग्न आहेत. आताच्या प्रवासी क्षमतेने हे फलाट आता अगदीच अपुरे पडतात. कर्जत, खोपोलीकडे जाणाऱ्या लोकल आणि मुंबईसाठी सुटणाऱ्या लोकल या एकाच फलाटावरून सुटतात. त्यामुळे येथे मोठी गर्दी होत असते. होम फलाटामुळे पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांची स्थानकावरील गर्दी विभागण्यास मदत होणार आहे.

 शिवसेनेचे अज्ञान

होम फलाटाच्या लोकार्पण कार्यक्रमापूर्वी शिवसेनेच्या वतीने रेल्वे स्थानक परिसरात मोठय़ा प्रमाणात फलकबाजी करण्यात आली होती. मात्र, या फलकांवर रेल्वेमंत्री म्हणून पीयूष गोयल यांचेच नाव झळकत होते. रेल्वेमंत्री बदलल्याचेही भान शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना नसल्यामुळे शिवसेनेच्या अज्ञानाची चर्चा बुधवारी चांगलीच रंगली होती.