कल्याण- कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथील जे. पी. पोस्टर मैदानावर मंगळवारी रात्री फूटबाॅल खेळणाऱ्या शालेय मुलांना गौरीपाडा, टावरीपाडा भागातील आठ तरुणांनी बेदम मारहाण केली आहे. मारहाण झालेली मुले शालेय विद्यार्थी आहेत.

मारहाण झालेल्या १७ वर्षाच्या एका अल्पवयीन मुलाने या मारहाण प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी मुलांचा शोध सुरू केला आहे. राजेश पंडित केणे (३३,रा. केणे निवास, टावरीपाडा), मुकेश भधोरिया (४५, खडकपाडा सर्कल), योगेश पंडित केणे, मनोज केणे, नीलेश केणे आणि इतर तीन अनोळखी इसम अशी आरपींची नावे आहेत. गौरीपाडा येथील जुना आरटीओ रस्त्यावरील त्रिवेणी लाॅरेन इमारतीच्या पाठीमागील जे. पी. पोस्टर मैदानावर मंगळवारी रात्री साडे दहा वाजता हा मारहाणीचा प्रकार घडला आहे. 

हेही वाचा >>> डोंबिवली एमआयडीसी विको नाक्यावरील कोंडीने रिजन्सी अनंतमधील रहिवासी हैराण

पोलिसांनी सांगितले, शहाड येथील रिजन्सी एन्टेलिया येथील शाळकरी मुले मंगळवारी रात्री जे. पी. पोस्टर मैदानावर फूटबाॅल खेळत होती. मैदानावर जाण्यासाठी मुलांनी आपल्या दुचाकी नेल्या होत्या. या दुचाकी त्यांनी ऑटो झोन कार्यशाळेच्या प्रवेशव्दारा समोर उभ्या केल्या होत्या. फूटबाॅल खेळत असताना मुलांना आपल्या दुचाकी जमिनीवर पडल्या असल्याचे लक्षात आले.

हेही वाचा >>> पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलांनी फूटबाॅल खेळ थांबून तेथे बाजुला असलेल्या राजेश केणे याला दुचाकी कशा काय पडल्या अशी विचारणा केली. त्याचा राग येऊन राजेशने विचारणा करणाऱ्या मुलाला मारहाण सुरू केली. आम्ही फक्त विचारणा करतोय तुम्ही मारहाण कशासाठी करता अशी मुले विचारत असताना एका मुलाने आपल्या पालकांना संपर्क करुन मैदानावर मारहाण होत असल्याचे कळविले. वडिलांना का कळविले म्हणून राजेशने अन्य एका खेळकरी मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. राजेशने आपले आरोपी मित्र मैदानात बोलावून घेतले. आरोपी आठ जणांनी एकत्र येऊन फूटबाॅल खेळणाऱ्या मुलांना बेदम मारहाण केली. त्यानंतर ते तेथून पळून गेले.