सोशल मीडियावर एकमेकांशी मैत्री होते, संवाद होतो, कधी कधी सामाजिक उपक्रमही राबवले जातात. अशा अनेक मित्र-मैत्रिणींना भेटण्यासाठी, गप्पागोष्टी करण्यासाठी, विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी विरारच्या नीलशार्दूल वडके यांनी ‘गप्पागोष्टी आणि डील’ हा कॅफे सुरू केला आहे. अर्थात केवळ सोशल मीडियाच नाही, तर इतरही अनेक मित्र या कॅफेमध्ये येऊन मनसोक्त गप्पा मारू शकतात, एकमेकांशी विविध विषयांवर चर्चा करू शकतात.. सोबत जिव्हा तृप्त करण्यासाठी रुचकर पदार्थही असतील.

या कॅफेचे नावच अगदी मस्त आहे, ‘गप्पागोष्टी आणि डील.’ येथे अनेक रुचकर आणि मन तृप्त करणारे पदार्थ मिळत असले तरी खवय्यांचा सर्वात लाडका पदार्थ आहे, ‘चिकन खिमा समोसा.’ हा चिकन खिमा समोसा या कॅफेची खासियत आहे. चिकन खिमा आणि घरगुती बनविलेला मसाला याच्या मिश्रणातून समोसामध्ये भरण्यात येणारा खिमा तयार करण्यात येतो. त्यानंतर समोसाची पट्टी बनवून त्यात मिश्रण पुरले जाते. समोसा आकर्षक दिसण्यासाठी त्यावर डिझाईन बनविली जाते, मग तो तेलामध्ये तळण्यात येतो. या सोबत खाण्यासाठी कॅफेमध्ये जी चटणी बनवली जाते, त्याची चव तर लज्जतदार आहे.

या कॅफेतील तरुणांचा आणखी एक आवडता पदार्थ म्हणजे क्रॅब गार्लिक ब्रेड. गार्लिक ब्रेड इतर ठिकाणीही मिळतो, मात्र येथे मिळणाऱ्या गार्लिक ब्रेडची चव दुसरीकडे कुठेच मिळणार नाही, असे वडके यांनी सांगितले. यामध्ये गार्लिक पेस्ट, कॅफेमध्ये बनवलेला मेयोनीज आणि इतर पदार्थ टाकले जातात. त्यामुळे ज्यांना स्पेशल पद्धतीचा समोसा आणि क्रॅब गार्लिक ब्रेड चाखायचे आहे, त्यांच्यासाठी हा कॅफे पर्वणीच आहे. येथे कोणताही पदार्थ तयार करून ठेवला जात नाही. त्यामुळे तुम्हाला नेहमी गरमागरम पदार्थच मिळतात. पदार्थाची चव टिकवण्यासाठी त्या पदार्थाची साठवण न करता आवश्यकतेनुसारच बाजारहाट केली जाते.

चहा-कॉफी नि चॉकलेट

या कॅफेमध्ये विविध प्रकारची कॉफी, कोल्डकॉफी, चहामध्ये टपरी चहा, आसाम चहा तसेच जिंजर मसाला चहा, ग्रीन लेमन टी, ग्रीन लेमन हनी, ग्रीन मिंट टी आणि इतर चहादेखील उपलब्ध आहेत. यांसह हॉट चॉकलेट, कोल्ड चॉकलेट, ओरिओ शेक, पी नट्स चॉकलेट, स्ट्रॉबेरी शेक, फ्रेंच फ्राइज, पास्ता, निरनिराळे सॅन्डविच, पिझ्झा येथे मिळतो.

पेंटिंग, ग्रीटिंग कार्ड, पुस्तके..

नीलशार्दूल यांनी आपल्या कॅफेमध्ये सर्वात जास्त महत्त्व कलेला दिले आहे. त्यांनी आपल्या कॅफेमध्ये पेंटिंग, ग्रीटिंग कार्ड, पुस्तके यांची सजावट केली आहे. काही पेंटिंग येथे विकलीही जातात. थ्रीडी ग्रीटिंग कार्डही येथे उपलब्ध आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेगवेगळ्या लेखकांची पुस्तके येथे विकण्यास ठेवली आहेत. खवय्यांना वाचण्यासाठीही पुस्तके दिली जातात. लाकडापासून आणि बांबूपासून बनवलेली शिल्पेही येथे विकण्यास ठेवली आहेत.

गप्पागोष्टी आणि डील

  • पत्ता : शॉप नंबर ८९, प्रथमेश प्लाझा, बोळींज रोड, बॅसिन कॅथॉलिक बँकेच्या शेजारी, विरार (पश्चिम).
  • वेळ : सकाळी १० ते रात्री १२.