कल्याण– गणपतीनिमित्त खरेदीसाठी नागरिक बाहेर पडल्याने डोंबिवली, कल्याण शहरातील बाजार दोन दिवसांपासून गर्दीने गजबजले आहेत. रविवार सुट्टीचा दिवस खरेदीसाठी मिळाल्याने दोन्ही शहरांमधील बाजार गर्दीने ओसंडून वाहत आहेत. गणपतीसाठी लागणारी विविध प्रकारच्या झाडांची पत्री, ऋषीपंचमी, हरितालिकेसाठी लागणाऱ्या झाडांची पाने खरेदीकडे नागरिकांचा ओढा आहे. बाजारात एकही वाहन येणार नाही अशा पध्दतीने वाहतूक पोलिसांनी नियोजन केले आहे. फडके रस्ता, ठाकुर्ली पूल भागात वाहतूक पोलीस तैनात असल्याने उलट मार्गिकेतून येणाऱी वाहने बंद झाली आहेत. त्यामुळे नेहमी कोंडीत अडकणारा फडके रस्ता आता कोंडी मुक्त झाला आहे.

हेही वाचा >>> कल्याण जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनंत कुलकर्णी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते विक्रेत्यांमुळे गजबजून गेले आहेत. बदलापूर, भिवंडी, कसारा, शहापूर ग्रामीण, आदिवासी भागातील महिलांनी विविध प्रकारच्या झाडांची पत्री विक्रीसाठी बाजारात आणली आहे. केळीच्या पानांना नागरिकांची सर्वाधिक मागणी आहे. ऋषीपंचमी, हरितालिकेकासाठी लागणाऱ्या झाडांची पत्री २० ते ३० रुपये, केवड्याची एक पात १०० रुपयांना विकली जात आहे. शहरातील बहुतांशी रिक्षा चालक कोकणातील आहेत. हा वर्ग गणपतीसाठी दोन दिवसांपासून कोकणात गेल्याने रिक्षा वाहनतळांवरील रिक्षांची संख्या घटली आहे. रिक्षेसाठी प्रवाशांना १० ते १५ मिनीट प्रतीक्षा करावी लागते.