कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, कचरा अशा अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. हा पसारा आटोक्यात आणण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेला भारतीय प्रशासकीय सेवेतील आयुक्त देण्यात यावा, अशी मागणी श्री गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष जयकृष्ण सप्तर्षी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त मुख्यमंत्री डोंबिवलीत आले होते. त्यावेळी मंदिरातर्फे हे निवेदन त्यांना देण्यात आले. बहुतांशी डोंबिवलीकर नोकरी, व्यवसायासाठी मुंबईत जातो. त्यांना प्रवासासाठी लोकल हा एक पर्याय आहे. रस्ते वाहतुकीसाठी शिळफाटा, भिवंडी वळण रस्ता हे दुसरे पर्याय आहेत. या शहाराला जोडणारा ठाणे-डोंबिवली रेल्वे समांतर रस्ता, माणकोली उड्डाण पूल उभारले तर या भागातील वाहतूक कोंडी कमी होईल.
मुंबईला नियमित जाणाऱ्यांची परवड काही प्रमाणात कमी होईल, अशी मागणी मंदिरातर्फे करण्यात आली आहे. पालिका अधिकाऱ्यांचे स्थानिक कर्मचाऱ्यांवर कोणतेही लक्ष नसल्याने डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर फेरीवाल्यांनी गजबजून गेला आहे. पदपथ, रस्ते फेरीवाल्यांनी व्यापल्याने रस्त्यावरून चालणे नागरिकांना शक्य होत नाही, अशी व्यथा निवेदनात मांडण्यात आली आहे.