डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग कार्यक्षेत्रातील कुंभारखाणापाडा, सरोवरनगर भागातील भूमाफियांच्या बेकायदा चाळी ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्या तोडकाम पथकाने मुसळधार पावसात जमीनदोस्त केल्या. यापूर्वीही याच भागातील बेकायदा चाळी तोडकाम पथकाने भुईसपाट केल्या होत्या.
गेल्या वर्षभराच्या काळात डोंबिवली पश्चिम खाडी किनारा परिसरातील बहुतांशी बेकायदा चाळी ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त सावंत यांच्या तोडकाम पथकाने भुईसपाट केल्या. खाडी किनारा भागात बेकायदा चाळी उभारणीसाठी केलेले भराव, जोती उखडून टाकले. भराव खाडीच्या पाण्यात जेसीबीच्या साहाय्याने लोटून दिले. या सततच्या कारवाईमुळे भूमाफियांना मागील तीन महिन्यात बेकायदा बांधकामे करता आली नाहीत.
आता पावसाळा सुरू आहे. या कालावधीत अधिकाऱ्यांचे आपल्याकडे लक्ष नाही, असा विचार करून भूमाफियांनी कुंभारखाणपाडा, सरोवरनगर खाडी किनारा परिसरात खासगी, सरकारी जमिनींवर बेकायदा चाळी उभारण्याचा सपाटा लावला होता. या चाळींच्या ठिकाणी पोहच रस्ते नाहीत. पाणी पुरवठा, मलनिस्सारणाची कोणतीही सुविधा नसताना या चाळींची उभारणी करण्यात आली होती. प्रभागात फिरत असताना साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना कुंभारखाणपाडा, सरोवर नगर भागात नव्याने बेकायदा चाळी उभारल्या जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी घटनास्थळी जाऊन ही बेकायदा चाळींची बांधकामे कोणी केली आहेत याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. भूमाफियांची नावे उघड केली तर आपणास नंतर माफियांकडून दादागिरी केली जाईल, त्रास दिला जाईल या भीतीने कोणीही रहिवाशांना चाळी बांधणाऱ्या माफियांची नावे पालिका अधिकाऱ्यांना सांगितली नाहीत.
दहा खोल्यांच्या या चाळी बेकायदा असल्याची खात्री पटल्यावर आवश्यक विहित प्रक्रिया पार पाडून साहाय्यक आयुक्त राजेश सावंत, अधीक्षक अरूण पाटील यांनी तोडकाम पथक, जेसीबीच्या साहाय्याने सरोवरनगर, कुंभारखाणपाडा भागातील बेकायदा चाळी भुईसपाट केल्या. कुंभारखाणपाडा, सरोवरनगर भागात उभारण्यात येणाऱ्या बहुतांशी बेकायदा इमारती, चाळींना काही राजकीय मंडळींचा आशीर्वाद असल्याची या भागात चर्चा आहे. या चाळी, इमारतींवर कारवाई करण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांना यापूर्वी संपर्क करून काही राजकीय मंडळींनी अडथळे आणल्याच्या तक्रारी आहेत. काही राजकीय मंडळी आपल्या बेकायदा बांधकामांना आपले पक्षीय वरिष्ठ वाचविण्यासाठी सहकार्य करत नसल्याने रुसव्या फुगव्याचे मागील काही महिन्यांपासून दलबदलू राजकारण करत असल्याची चर्चा आहे.
गेल्या आठवड्यात देवीचापाडा खाडी किनारी मातीचे बेकायदा भराव करणाऱ्या भूमाफियांविरुध्द महसूल विभागाने कांदळवन नष्ट करून पर्यावरणाला बाधा आणाऱ्या माफियांच्या विरुध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बेकायदा बांधकामांवर नजर ठेवणे. त्यांच्यावर कारवाईसाठी पालिकेकडे पाठपुरावा करण्याची स्थानिक पोलिसांचीही जबाबदारी आहे. स्थानिक पोलीस अशा बेकायदा बांधकामे उभारणाऱ्या भूमाफियांची पाठराखण करत असल्याच्या तक्रारी आहेत.