एमएमआरडीए, पालिकेकडून बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष

डोंबिवलीलगत असलेल्या २७ गावांच्या परिसरात १५० बेकायदा इमारती उभारण्यात आल्या असून त्यात सहा हजार रहिवाशी राहत असल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे. गेल्या पाच वर्षांत ही बांधकामे झाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने  ४७५ बेकायदा बांधकामांची यादी भूमाफियांच्या नावासह पहिल्या टप्प्यात जाहीर केली आहे. या बांधकामांमध्ये  चाळी, दुकाने, गोदामे, दुमजली, तीन मजली इमारती आदींचा समावेश आहे. ही बांधकामे काही ठिकाणी सुरू आहेत तर काही ठिकाणी बांधून तयार आहेत. तयार बेकायदा इमारतींमध्ये सदनिका खरेदी करून पाच ते सहा हजार रहिवासी तेथे निवास करीत आहेत, असा प्राथमिक अंदाज आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरणाने (एमएमआरडीए) २७ गावांसाठी तयार केलेल्या विकास आराखडय़ात विविध सोयी-सुविधांसाठी आरक्षित असलेल्या असलेल्या जमिनींवरदेखील बेकायदा इमारती बांधण्यात येत आहेत. पिसवली, नांदिवली पंचानंद आदी ठिकाणी सरकारी, गावठाण, जिल्हाधिकारी मालकीच्या, वन विभागाच्या जमिनी बळकावून गेल्या काही वर्षांत या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने बेकायदा इमारती उभ्या राहिल्या आहेत.

तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी नांदिवली भागातील ५४ बेकायदा इमारती तीन वर्षांपूर्वी सील केल्या होत्या. पण सील कायम ठेवून नंतर त्या बेकायदा इमारती उभ्या राहून तेथे रहिवास सुरू झाला आहे. त्यामुळे सील ठोकूनही या इमारती कशा उभ्या राहिल्या, असा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे. गेल्या पाच वर्षांत ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी २७ गावांच्या हद्दीत केलेल्या सर्वेक्षणात  ४७५ बेकायदा  झाल्याचे आढळून आली आहेत.

सर्वाधिक बेकायदा बांधकामे कल्याण, डोंबिवली शहरांजवळील आजदे, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, भोपर, काटई, कोळे, आडिवली ढोकळी, भाल, माणेरे, आशेळे पट्टय़ात सुरु आहेत. हा सर्व भाग कल्याण-डोंबिवली पालिकेच्या हद्दीत आला आहे. पण, पालिकेचे अतिक्रमण नियंत्रण विभागाचे अधिकारी माफियांना बांधकामांची कागदपत्रे सादर करा, (‘बीपीएमसी’मधील २६० च्या नोटिसा) अशा नोटिसा पाठवून माफियांबरोबर तडजोड करून बेकायदा बांधकामांचे संरक्षण करीत आहेत, अशा तक्रारी आहेत. अनेक भागांत चाळी, गोदामे बांधून ती फेरीवाल्यांना सामान, निवासासाठी देण्यात आली आहेत.

  • बेकायदा बांधकामे- दाखल गुन्हे – रहिवासी
  • नांदिवली पंचानंद – ५९ इमारती, २४ गुन्हे, एक हजार
  • पिसवली – २० इमारती, ७ गुन्हे, ४००
  • आडिवली – ६ इमारती, ३ गुन्हे, १८०
  • आशेळे – ९ इमारती, १६०
  • गोळवली – ५ इमारती, २००
  • भोपर- ५ इमारती, १००
  • काटई, कोळे, माणगाव – ३० इमारती